मित्रांसोबत गेला परतलाच नाही; वैनगंगेत बुडून विद्यार्थ्याचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:02 IST2026-01-15T16:57:04+5:302026-01-15T17:02:37+5:30
मकरसंक्रांतीच्या दिवशी तामसवाडीवर शोककळा : दोन मित्रांचे प्राण वाचले

Went with friends and never returned; student dies after drowning in Waingang
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मकरसंक्रांतीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी बुधवारी (१४ जानेवारी) तामसवाडी गावावर काळोख पसरला. येथील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांपैकी क्षितिज लीलाधर लांजेवार (१६) याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभर सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.
क्षितिज लीलाधर लांजेवार, आर्यन श्रीराम ठाकरे (१६) व रुद्र नरेश अमृते (१५) हे तामसवाडी येथे राहणारे तिघेही जिवलग मित्र डोंगरला येथील पंडित दीनदयाल विद्यालयाचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी होते.
बुधवारी सकाळी सुमारे १०:३० वाजताच्या सुमारास हे तिघेही मकरसंक्रांतीनिमित्त वैनगंगा नदीत आंघोळीसाठी उतरले होते. मात्र, नदीतील पाण्याची खोली व वाढलेल्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यात क्षितिज खोल पाण्यात बुडाल्याने काही क्षणातच पाण्यात गडप झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तामसवाडी गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
क्षितीजच्या मृत्यूने लांजेवार
कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नदीपात्रात ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
मनोज केवट ठरला देवदूत
दरम्यान, नदी किनारी दूर अंतरावर मासेमारी करत असलेल्या मनोज केवट यांच्या कानावर आरडाओरड ऐकू येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीकडे धाव घेतली. जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन आधी आर्यन व नंतर रूद्रला वाचविले. तिसऱ्यांदा पाण्यात उडी घेऊन क्षितिजच्या मदतीला धावला, मात्र तोपर्यंत तो पाण्यात गडप झाला होता. गावात घटनेची माहिती देऊन क्षितिजचे शोधकार्य सुरू झाले. दुपारी २:३० पाण्यात तो मृतावस्थेत आढळला.
इशारा फलक लागणार?
या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक नदीपात्रांवर इशारा फलक लावणे, रेती उपशावर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे गांर्भीयाने लक्ष देण्ळाची गरज आहे.
यात्रा उत्सवात मंडळ अलर्ट
या दुर्दैवी घटनेनंतर यात्रा व्यवस्थापनाने भाविक व नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास तसेच स्नानासाठी प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर, काठावर फेरफटका मारण्यासही मनाई केली. सिहोरा पोलिसांनी मंडळाला अलर्ट राहण्याचे सूचना दिल्या आहेत.
रेती उपशामुळे नदीपात्र बनले जीवघेणे
तामसवाडी येथील वैनगंगा नदीपात्र अत्यंत विस्तीर्ण व खोल असून, धोकादायक आहे. मात्र, आजपर्यंत येथे कोणतेही इशारा फलक, प्रतिबंधक सूचना किंवा सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. त्यातच रेती घाटातून सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये साचलेले खोल पाणी नागरिकांच्या व युवकांच्या जीवावर बेतत आहे.
क्षितिज होता दहावीचा विद्यार्थी
क्षितिज हा इयत्ता दहावीचा वर्गातील हुशार विद्यार्थी होता. दीड महिन्यावर त्याची दहाव्या वर्गाची परीक्षा होती. तीनही जिवलग मित्रांनी आंघोळीचा बेत ठरविला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आई-वडिलांना क्षितिज एकुलता एक होता. पोहता येत नसताना कशाला गेला, आता कुठे शोधू माझ्या लेकराला... - असा आईचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा होता.