Showroom, shop parking street | शोरूम, दुकानांची पार्किंग रस्त्यावर

शोरूम, दुकानांची पार्किंग रस्त्यावर

ठळक मुद्देबाजारपेठेत वाहतुकीची कोंडी : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, शोरूम मालकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिल्या जात आहेत. मुख्य मार्गालगतच्या सोबतच बाजारपेठेतील अनेक दुकाने, शोरूममध्ये ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. मात्र ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधाच उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत.
निम्मा रस्ता पार्किंगसाठी वापरला जात असल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. वाहतूक शाखेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य मार्गालगत, बाजारपेठेत आणि साई मंदिर मार्गावर कपड्यासह इतर वस्तूंचे शोरूम आहेत. मात्र, शोरूममालकांनी खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना पार्किंगसाठी कुठलीही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी शोरूममालकांनी पार्किंगच्या जागेतही विविध साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सर्रास रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने दिवसभर बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यासह निम्मा प्रमुख मार्ग पार्किंगने व्यापलेला दिसून येतो. साईमंदिर मार्ग पूर्वीच अरुंद आहे. या मार्गालगतच्या एकाही व्यावसायिकाने ग्राहकांच्या वाहनाकरिता पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यातच चारचाकी वाहन आल्यास वाहतूक व्यवस्था तासन्तास कोलमडते.
दुचाकी वाहनधारक वैताग व्यक्त करताना दिसतात. याशिवाय प्रमुख मार्गावर दुतर्फा चारचाकी वाहने दिवसा आणि सायंकाळनंतर तासन्तास उभी असतात. मात्र, कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांना दिसत नाही. दिवाळी सणामुळे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अतिक्रमणामुळे दररोज कोलमडते वाहतूक
साईमंदिर मार्गावर अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. तर बाजारपेठेत अनेकांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत विविध साहित्य थाटून अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्यास हातभार लागत आहे. वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवून वाहनधारकांसह संबंधित शोरूम, दुकानमालकावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

अतिक्रमणाकडे पालिकेची डोळेझाक
बाजारपेठेसह प्रमुख मार्गालगत अनेकांनी विविध प्रकारे अतिक्रमण केले असताना नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविले जात नाही. दुसरीकडे लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण करताना ते तातडीने काढले जाते. अतिक्रमण काढण्यात नगरपालिकेकडून पक्षपात करण्यात येत असल्याने नागरिकांत असंतोष आहे.

Web Title: Showroom, shop parking street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.