हायवेवर क्यूआर स्कॅन करून कंत्राटदारापासून, इंजिनीअरचीही कुंडली काढा; टोल प्लाझा, ट्रक ले-बाय आणि थांब्यावर कोड बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:22 IST2025-11-12T19:21:57+5:302025-11-12T19:22:36+5:30
Bhandara : १०३३ आपत्कालीन हेल्पलाइनची माहितीदेखील क्यूआर कोडद्वारे मिळणार आहे. याचा उपयोग प्रवाशांना होणार आहे.

Scan QR on highways to identify contractors and engineers; Code mandatory at toll plazas, truck lay-bys and stops
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशभरातील महामार्गावर आता क्यूआर कोड असलेली होर्डिंग्ज लावली जाणार आहेत. हा कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना महामार्ग क्रमांक, किलोमीटर चिन्ह, महामार्गावर गस्त घालणाऱ्या टीमचे फोन क्रमांक, टोल व्यवस्थापक आणि रेसिडेंट इंजिनिअर यांचे संपर्क क्रमांक तसेच आपत्कालीन हेल्पलाइन १०३३ यांची माहिती मिळेल. तसेच त्या रस्त्याचे बांधकाम करणारी कंपनी, जबाबदार अभियंता आणि संपर्क क्रमांक पाहता येईल.
सदर क्यूआर कोड प्रणालीमुळे महामार्ग सुरक्षेत मोठी भर, प्रवाशांची आपत्कालीन संपर्क प्रक्रिया सुलभ, प्रकल्पांमधील पारदर्शकता वाढणार, बांधकाम गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक सहभाग, जबाबदार अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. 'नो टोल फॉर्मेलिटी', 'नो मध्यस्थ' अशी व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. डीजिटल सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास दिलासादायक होणार आहे. एका क्लिकवर माहितीही उपलब्ध होईल.
रुग्णालये, पेट्रोलपंप, पो. ठाणे, हॉटेलची माहिती
महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मार्गावरील रुग्णालये, पेट्रोलपंप, रेस्टॉरंट, पोलिस ठाणे, वाहन दुरुस्तीची दुकाने आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी सेवेची माहिती मिळेल.
कोड स्कॅन करताच 'ही' माहिती मिळणार
प्रवाशांनी आपल्या स्मार्ट फोनने होर्डिंगवरील क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांना खालील महत्त्वाची माहिती त्वरित मिळेल. त्यामध्ये महामार्ग क्रमांक, त्याची एकूण लांबी, तसेच बांधकाम आणि देखभालीशी संबंधित सविस्तर तपशील समाविष्ट असणार आहे.
महामार्गावर गस्त घालणारे पथक, टोल व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक आणि निवासी अभियंता यांचे संपर्क क्रमांक मिळतील. यासोबतच राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १०३३ देखील उपलब्ध असेल.
हायवेवर लागणार क्यूआर कोडचे होर्डिंग्ज
भारत सरकारने देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर क्यूआर कोड असलेले होर्डिंग्ज लावण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक होईल.
परिस्थितीत आपत्कालीन हमखास मदत मिळणार
- या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवून देणे आणि प्रवासात येणाऱ्या अडचणी कमी करणे हा आहे.
- याशिवाय, रस्ता बांधकामाशी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची माहितीदेखील यातून मिळणार असल्यामुळे कामात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.
- प्रवाशांना हे क्यूआर कोड सहज दिसावेत, यासाठी टोल प्लाझा, विश्रांतीची ठिकाणे, ट्रक ले-बाय आणि महामार्गाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या पॉइंटवर हे साइन बोर्ड लावणार आहेत.
- या डिजिटल सुविधेमुळे महामार्गावरील प्रवास सुकर होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना मदत मिळणार आहे. रस्त्याच्या कामाशी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची माहितीही यातून मिळू शकणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर आवश्यक माहिती मिळेल.