अपघातातील मृतकाची माहिती देण्यास रेल्वे विभागाची टाळाटाळ

By Admin | Updated: May 2, 2015 00:44 IST2015-05-02T00:44:43+5:302015-05-02T00:44:43+5:30

स्पर्धा परीक्षा आटोपून गावाकडे परतणाऱ्या तरूणाचा रेल्वे गाडीतून खाली पडून अपघाती मृत्यू झाला.

Railway Department's evasion to provide information about accidental death | अपघातातील मृतकाची माहिती देण्यास रेल्वे विभागाची टाळाटाळ

अपघातातील मृतकाची माहिती देण्यास रेल्वे विभागाची टाळाटाळ

पालकांचा आरोप, आत्मदहनाचा इशारा
भंडारा : स्पर्धा परीक्षा आटोपून गावाकडे परतणाऱ्या तरूणाचा रेल्वे गाडीतून खाली पडून अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती देण्यास रेल्वे विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत, न्याय न मिळाल्यास नागपूर रेल्वे स्टेशनसमोर आपले आयुष्य संपविण्याचा इशारा मृत तरूणाच्या आई-वडिलांनी दिला आहे.
लाला लजपतरॉय वॉर्ड, भंडारा येथील शुभम देवानंद पिल्लेवान (१९) हा तरूण गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्टॉप सिलेक्शन कमिशनची लेखी परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर येथे गेला होता. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्काळ तिकीट घेवून कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्रने भंडाराकडे येण्यास निघाला. तथापि, तिकीट कनफर्म झाली नाही. परिणामी आरक्षित डब्यात बसून त्याने पुढचा प्रवास सुरू केला.
दरम्यान दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर येथे पोहचत असताना धंतोली भागात डब्यातून पडून त्याचा मृत्यू झाला.
शुभमच्या आई-वडिलानी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच तासापर्यंत शुभमचा मृतदेह रेल्वे रूळावर पडून होता आणि या अवघीत अनेक गाड्या त्या शरीरावरून गेल्याने मृतदेहाच्या चिंधळ्या झाल्या. रेल्वे प्रशासनाने अनेक तास पर्यंत घटनेची दखल घेतली नाही. शुभमने केलेल्या प्रवासाची माहिती मिळू नये, तो विना तिकीट प्रवास करीत होता, असे भासविण्यासाठी त्याच्या पॅन्टच्या खिशातून पर्स काढून घेण्यात आल्याचा आरोपही आई-वडिलांनी केला आहे.
रेल्वे डब्यातून पडून शुभमच्या मृत्यूसंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली पिल्लेवान दाम्पत्याने रेल्वे प्रशासनाकडे आधी २७ जानेवारी व नंतर ११ मार्च रोजी माहिती मागितली. परंतु अद्यापर्यंत माहिती पुरविण्यात आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस आणि प्रशासनावर योग्य कारवाई करून शुभमला न्याय देण्याची मागणी पिल्लेवान कुटूंबियांनी केली आहे.
न्याय न मिळाल्यास नागपूर रेल्वे स्थानकासमोर स्वत:चे जीवन संपविण्याचा इशारा वडिल देवानंद, आई सुषमा आणि बहिण प्रांजली पिल्लेवान आदींनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Railway Department's evasion to provide information about accidental death