निलंबित वनरक्षकाला राजकीय वरदहस्त ? शासकीय कार्यात अडथळा आणल्याचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:31 IST2025-10-24T20:30:28+5:302025-10-24T20:31:24+5:30
Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली.

Political favour to suspended forest guard? Case of obstruction of government work
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधीर तेजराम हुकरे या वनरक्षकावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती. यावरूनच भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांनी १५ ऑक्टोबरला त्याच्या निलंबनाचे आदेश काढले होते. आता या निलंबित वनरक्षकाने प्रकरण दाबण्यासाठी राजकीय आधार घेत असल्याची बाब समोर आली आहे.
साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. माहितीच्या आधारे लाखनी पोलिसांचे पथक पेंढरी गावाकडून खुर्शीपार बांधगावाकडे निघाले. यात एका टिप्परच्या मागे एका चारचाकी वाहनाने पोलिसांच्या वाहनाला साइड दिली नाही. पोलिसांना चकमा देत रेतीचा टिप्पर तिथून पसार झाला.
पोलिसांनी वाहन चालकाला विचारणा केल्यावर टिप्पर हा हरीश शेंडे, रा. मन्हेगाव याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी हरीश शेंडे (४०), सुधीर तेजराम हुकरे (३२), प्रीतेश बलवंत झलके (२४) आणि टिप्परचालक याच्याविरुद्ध अवैध रेतीची वाहतूक करणे, पर्यावरणाचे नुकसान करणे आणि शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता मात्र हा हुकरे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय नेत्यांकडे चकरा मारत असल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हुकरे रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. यात ते कर्मचारी कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
डीएफओंच्या आदेशात ठेवला होता ठपका
- शासकीय सेवक म्हणून वन विभागात कार्यरत असताना सुधीर हुकरे हा रेतीची अवैध विक्री व वाहतूक प्रकरणात लिप्त असल्याची बाब समोर आली होती.
- तसेच असे गैरकृत्य करीत असताना मुख्यालयात अनुपस्थित राहून शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत व वन विभागाची प्रतिमा मलिन केली, असा ठपका उपवनसंरक्षकांच्या आदेशात नमूद आहे.