बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:39+5:302021-06-06T04:26:39+5:30

भंडारा : बहिणीला नेहमी मारहाण करून त्रास देणाऱ्या जावयाचा मेहुण्याने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना येथील कस्तुरबा वाॅर्डात शुक्रवारी ...

Murder of Javaya who tormented his sister | बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून

भंडारा : बहिणीला नेहमी मारहाण करून त्रास देणाऱ्या जावयाचा मेहुण्याने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना येथील कस्तुरबा वाॅर्डात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल अमर मोगरे (३०) रा.कस्तुरबा वाॅर्ड भंडारा असे मृताचे नाव आहे. तर पदमकुमार उर्फ सुशील संजू संदेश (३३) रा.कस्तुरबा वाॅर्ड भंडारा असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे. मंगल हा आपल्या पत्नीसह सासुरवाडी असलेल्या कस्तुरबा वाॅर्डातच राहत होता. परंतु गत काही दिवसांपासून तो पत्नीला नेहमी मारहाण करून त्रास देत होता. पत्नीने हा प्रकार भाऊ सुशील याला सांगितला. त्याने मंगलची समजूतही काढली. परंतु त्याने त्रास देणे थांबविले नाही. शुक्रवारी रात्री सुशीलची बहीण आपल्या माहेरी आली. मंगल घरी एकटा असल्याचे पाहून सुशील धारदार शस्त्र घेऊन तेथे पोहचला. काही कळायच्या आत त्याने शस्त्राने छातीवर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. प्रभारी ठाणेदार बंडोपंत बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. शनिवारी सकाळी आरोपी सुशीलला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास ठाणेदार बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक जंगले, इंगळे, शेंडे, हवालदार बापूराव भुसावळे, भोंगाडे, वाघमारे, मेश्राम, कुकडे, बुरडे, बन्सोड, गोन्नाडे, मेश्राम आदी तपास करीत आहेत.

Web Title: Murder of Javaya who tormented his sister