साकोली येथील जुनी तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने व दिवसेंदिवस कामाचा वाढता व्याप आणि जागाही अपुरी पडत होती. परिणामी तत्कालीन आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नांतून गडकुंभली रोडवर प्रशस्त जागेवर टोलेजंग असे भव्य इमारत उभारण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च करून २०१८ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, तर २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जुलै २०१९ पासून सर्व सोयीयुक्त ही इमारत महसूल विभागाला हस्तांतरित केली. मात्र, दोन वर्षांतच या इमारतीच्या काही भागाला गळती लागली आहे. काही भिंतींना ओलावा सुटला असून, छताचे पाणीही गळू लागले आहे. इमारतीच्या मुख्य सभागृहात अक्षरशः पाणी साचून राहते. त्यामुळे येथे बैठकी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास येणाऱ्या लोकांना पाणी गळत असलेली जागा सोडून बसावे लागते, तर पाण्यात पाय राहत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रत्यक्ष अनुभव गत आठवड्यात एका सभेदरम्यान नागरिकांना आला. त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.
बॉक्स
ही इमारत बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, दोन वर्षांतच जर इमारतीला गळती लागली असेल तर खरोखरच बांधकाम किती दर्जेदार आहे हा प्रश्न निर्माण होत आहे. या इमारती बांधकामावर ज्या शाखा अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती त्या अभियंत्याने खरोखरच गुणवत्तेकडे लक्ष दिले काय, याचीही चौकशी करण्यात यावी. ही इमारती बांधकाम दरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असावेत अशी चर्चा असून, अवघ्या दोन वर्षांतच स्लॅब गळती लागल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.