पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: August 24, 2014 23:17 IST2014-08-24T23:17:50+5:302014-08-24T23:17:50+5:30

बैलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळा सणावर यावर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एकीकडे पाऊस नाही दुसरीकडे कडक ऊन्ह.

Due to drought on the hive | पोळ्यावर दुष्काळाचे सावट

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

भंडारा : बैलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळा सणावर यावर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एकीकडे पाऊस नाही दुसरीकडे कडक ऊन्ह. यामुळे पीके करपायला लागले असतांना आनंदोत्सव कसा साजरा करावा, असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी बाजारपेठेमध्ये बैलांच्या सजविण्याच्या वस्तूंच्या खरेदीत कमालिची घट आली आहे.
श्रमाचा पुजारी म्हणून बैलाला संबोधल्या जाते. बैलाच्या सहाय्याने वर्षभर शेतीची कामे केली जातात. या निष्काम कर्माचे उपकार फेडावे, यासाठी पोळ्याच्या सणाचे आयोजन करण्यात येते.
यादिवशी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड जेवू घातले जाते. शेतकरी कुटुंब बैलांसमोर नतमस्तक होऊन त्याला प्रणाम करतात. प्रत्येक गावांमध्ये पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो.
महादेवाकडे बैलजोडीला नेण्यापूर्वी बैलांना सजविले जाते. सजविण्यासाठी बेगड, रंग, झुल, नवीन वेसन, घुंगरू आदींची खरेदी शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात करीत असतात.
पोळ्याच्या सणाच्या १५ दिवसांपूर्वीपासून ही खरेदी सुरू होते. आठवडी बाजारातून बैलांना जेऊ घालण्यासाठी नवीन टोपली, विविध प्रकारच्या भाज्या, पाय धुण्यासाठी लहान तांबूला खरेदी केले जाते. हे सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह दिसून येत होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीपासून धक्के देणाऱ्या पावसाने मागील २० दिवसांपासून कायमची दडी मारली आहे. त्यामुळे रोवण्याची कामे रखडली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशा शेतकऱ्यांंचे पीक करपायला लागले आहे. काही शेतकऱ्यांंचे तर धानाचे पऱ्हे करपणे सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.
पोळ्याचा सण धानाची रोवणी झाल्यानंतर येतो. या कालावधीत हिरवेगार पीक शेतात डोलत असते. शेतीसाठी खर्च झाल्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नसला तरी हिरवेगार पीक त्याच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. त्यामुळे वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घेऊन पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याकडे कल असतो.
यावर्षी मात्र पिकच करपायला लागल्याने कर्ज काढण्याची त्याची हिंमत राहिली नाही. परिणामी पोळ्याचा सण आला असतांनाही बैलांच्या साजाच्या वस्तूंची खरेदी पाहिजे, त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. उदार अंत:करणाचा बळीराजा यावर्षी त्याच्या साथीदाराला सजविण्यासाठी व त्याचा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी हात आखुडता घेत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to drought on the hive