जिल्हाधिकाऱ्यांनी केली रोहयो कामाची पाहणी

By Admin | Updated: June 9, 2015 00:50 IST2015-06-09T00:50:34+5:302015-06-09T00:50:34+5:30

वादळाने झालेले नुकसान, रोहयोची कामे, शतकोटी वृक्ष लागवड व चिचाळ येथे मत्स्यबिज केंद्राची पाहणी करून ...

District Collector reviewed the work | जिल्हाधिकाऱ्यांनी केली रोहयो कामाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली रोहयो कामाची पाहणी

लाखांदूर : वादळाने झालेले नुकसान, रोहयोची कामे, शतकोटी वृक्ष लागवड व चिचाळ येथे मत्स्यबिज केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केलेल्या विकास कामाची प्रत्यक्ष अर्धा कि.मी. पायी चालून पाहणी केली. सोनी, इंदोरा येथील भातखाचरे कामाची पाहणी केली. तसेच पं.स. अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शतकोटी योजनेंतर्गत चप्राड पहाडीयेथील वृक्ष लागवडीची पाहणी केली. तालुक्यातील विकास कामाचा आढावा घेत केलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. तसेच पं.स. अंतर्गत चिचाळ / बारव्हा येथील मत्स्यबीज केंद्राची सुद्धा पाहणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. कंत्राटी पॅनल अधिकाऱ्यांना मात्र बेशीस्तीचे वर्तनाबद्दल चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा पहिलाच दौरा अनेकांची दमछाक करणारा ठरला असला तरीपण प्रशासकीय कामासंदर्भात हयगय ठरणाऱ्यांसाठी चांगलाच चपराक बसणारा ठरला. तालुक्यातील इतर अनेक ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) पडोळे, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, तहसीलदार विजय पवार, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: District Collector reviewed the work