सुनावणी सुरू असतानाच आला मृत्यू! संचालकाला शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ह्रदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:55 IST2025-08-29T17:53:55+5:302025-08-29T17:55:11+5:30

भंडारा जिल्हा परिषदेतील घटना : मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखल्याचे प्रकरण; सुनावणीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच संचालकाचा हृदयविकाराने मृत्यू

Death occurred while the hearing was in progress! The director suffered a heart attack in the education officer's office. | सुनावणी सुरू असतानाच आला मृत्यू! संचालकाला शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ह्रदयविकाराचा झटका

Death occurred while the hearing was in progress! The director suffered a heart attack in the education officer's office.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
वादात असलेल्या शैक्षणिक संस्थेतील दोन मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, एका ८५ वर्षीय वयोवृद्ध संचालकांचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २८ ऑगस्टला सायंकाळी ४:४५ वाजताच्या सुमारास घडली. जगन्नाथ श्रीराम बडवाईक असे या मृत संचालकाचे नाव आहे. 


नवप्रभात शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत वाद असून दोन कार्यकारिणी आहेत. त्यापैकी एका कार्यकारिणीतील सचिव हेमंत बांडेबुचे यांनी या संस्थेअंतर्गत चालविण्यात येत असलेल्या कोथुर्णा आणि कन्हाळगाव या दोन शाळांमधील मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखण्याचे पत्र दिले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणाधिकारी मंगला गोतरणे यांनी गुरुवारी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीसाठी दोन्ही संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.


दुपारी ३ वाजताची ही सुनावणी दुपारी ४:३० वाजता सुरू झाली. त्यासाठी या संस्थेच्या कार्यकारिणीत कोषाध्यक्ष पदावर असलेले जगन्नाथ बडवाईक हे देखील पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात आले होते. दरम्यान, सुनावणी सुरू झाल्यावर काही वेळातच त्यांना खुर्चीवर बसल्या बसल्या हृदयविकाराचा झटका आला. ते खुर्चीतच कोसळले.


हे लक्षात येताच खालच्या मजल्यावर नेऊन वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. नंतर, खाजगी वाहनाने एका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे या विषयावर १ ऑगस्टला पहिली सुनावणी बोलावण्यात आली होती. ती रद्द झाल्याने २८ ऑगस्टला दुसरी सुनावणी होती.


तडजोडीसाठी दोन्ही संस्थांना बोलावले होते : गोतरणे
या संदर्भात शिक्षणाधिकारी मंगला गोतरणे यांना विचारणा केली असता, ही संस्था वादातील असल्याने कुण्या एका कार्यकारिणीला नियमानुसार शाळेतील कर्मचाऱ्यांची अशी वेतनावाढ रोखता येत नाही. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी दोन्ही कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. दुपारी ३ वाजता सुनावणी होती. मात्र ती पावसामुळे सुनावणी उशिरा सुरू झाली. अध्यक्ष व सचिवांनी थांबून इतरांनी स्वाक्षरी करून जाण्यास आपण सुचविले होते. मात्र बडवाईक यांच्यासह सारेच बसून होते, अशी माहिती त्यांनी दिली. सुनावणीनंतर दोन्ही मुख्याध्यापकांना वेतनवाढ लागू करून त्यांची देयके काढण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.


घटनेला प्रशासन कारणीभूत : आरोप
या घटनेला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. वेतन पथक अधीक्षकांना असे पत्र काढण्याचा अधिकार नाही. हे पद शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिनस्त असते. सर्व संचालकांना बोलावून अधीक्षकांनी काय साध्य केले, असा प्रश्न संघाने उपस्थित केला असून दोषींवर बडतर्फीच्या कारवाईची मागणी केली.


वेतन अधीक्षकांनी काढले होते पत्र
सुनावणीसाठी कार्यकारिणीतील सर्व संचालकांनी उपस्थित राहण्याचे पत्र भविष्य निर्वाह निधी पथकाच्या वेतन अधीक्षक प्रभा दुपारे यांनी काढल्याची माहिती पुढे आली आहे. त्या पत्रामुळे एका कार्यकारिणीतील ११ व दुसऱ्या कार्यकारिणीतील दोन संचालक उपस्थित होते, अशी माहिती आहे.

Web Title: Death occurred while the hearing was in progress! The director suffered a heart attack in the education officer's office.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.