लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जैवविविधता धाेक्यात येते. जंगलात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. जंगलात आग लावणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची तयारी वनविभागाने केली आहे.भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅंट तयार करण्यात आला आहे. वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी जागृक नागरिकांनी पुढाकर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागते रहाेचे आदेश- वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये काम करताना कचरा पेटवून दिला जाताे. गवत चांगले यावे यासाठी आग लावून दिली जाते. वनातून जातांना बिडी, सिगारेट फेकली जाते. त्यामुळे आग लागून माेठे नुकसान हाेते. यावर नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेचे आदेश देण्यात आले आहे.
हाेवू शकताे एक वर्ष कारावास, अन् पाच हजार रुपये दंड- राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वनविभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वनविभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर द्यावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.