टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST2021-06-16T04:46:45+5:302021-06-16T04:46:45+5:30

भंडारा : कोरोना महामारीच्या काळात आबालवृद्धांपासून सर्व घरीच होते. त्यामुळे मुलांना मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही होते. त्यातच ...

Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of growing stomach upset! | टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती !

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती !

भंडारा : कोरोना महामारीच्या काळात आबालवृद्धांपासून सर्व घरीच होते. त्यामुळे मुलांना मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही होते. त्यातच टीव्हीसमोर बसून मुले जेवत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या सवयीमुळे मुलांमध्ये पोटविकार वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

कोरोनाकाळात अनेक सवयींमध्ये बदल दिसून आला आहे. यात बच्चेकंपनीही मागे नाही. अशा परिस्थितीत मुलांना करमणूक किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल, लॅपटॉपवर खेळण्याचे किंवा टीव्ही पाहण्याचा कालावधी वाढला. टीव्हीसमोर बसूनच जेवण्याची सवयसुद्धा लागली आहे. घरच्या घरीच असल्याने आई किंवा बाबांकडे फास्ट फूड घेऊन मागायचा हट्टही केला जातो. तो पदार्थही टीव्हीसमोर बसूनच बच्चेकंपनी खात असतात. त्यामुळे त्यांना विकार जडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिखट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थांनी मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकडे पाल्यांनी जागरूक राहून लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

बॉक्स

पोटविकाराची प्रमुख कारणे

लहानसहान कारणांवरून पोटविकार होत असतात; परंतु गत १५ महिन्यांपासून घरीच राहून बच्चेकंपनीच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. टी.व्ही.समोर बसून जेवण करणे किंवा अन्य पदार्थ खात असतील तर पोटविकार वाढेल. मानसिकरीत्या चिंता किंवा तिखट मसाले पदार्थ ही पोटविकाराची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय जेवताना घाई करणे, चावून-चावून न खाणे, अन्य क्षुल्लक बाबींकडे दुर्लक्ष करणे या बाबीही पोटविकाराला कारणीभूत ठरू शकतात, याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

बॉक्स

पोटविकार टाळायचे असतील तर...

लहान मुलांची सवय आपल्याला बदलता येते; परंतु पोटविकाराच्या बाबतीत उशीर करता कामा नये; कारण पोटाचे दुखणे मुलांसाठी कधी-कधी गंभीर बनू शकते. पोटविकार टाळायचे असल्यास मुलांना सात्त्विक आहार देणे योग्य आहे. घरीच केलेला स्वयंपाक व त्यात अतितिखट व जास्त तेलकट पदार्थ नसावेत. आहारात सॅलडचा प्रयोग करावा, जेणेकरून मुलांची पचनक्रिया सहज होईल. याशिवाय फळेही खायला द्यावीत.

कोट बॉक्स

मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही

अनेकदा माझी दोन्ही मुले टीव्ही बघण्यासाठी हट्ट करीत असतात. कधी-कधी अडीच ते पाच तासांपर्यंत ती टीव्ही पाहत असतात. ती टीव्हीसमोर बसूनच जेवत असल्याने चिंता वाढली आहे.

- वैशाली लांजेवार, गृहिणी.

कोट बॉक्स

मुलांनी एकदा हट्ट केला तर ती सहसा मागे जात नाहीत. आपल्यालाच त्यांच्या हौशी पूर्ण कराव्या लागतात. माझी मुलेही टीव्हीसमोर बसून जेवतात, ही योग्य बाब नाही, याची मला जाणीव आहे.

- संध्या गोटेफोडे, गृहिणी.

कोट बॉक्स

मुले जेवत नाहीत म्हणून मी त्यांना थोड्या वेळासाठी टीव्ही लावून देते. मात्र त्यानंतर त्यांच्यासोबत मी स्वतः वेळ घालविते. घरगुती खेळांकडे त्यांचे मन वळविण्यात मी यशस्वी झाले आहे.

- कविता रंगारी, गृहिणी

कोट बॉक्स

तिखट मसाल्यांचा वापर, चिंता व जेवणात घाई करणे ही पोटविकाराची प्रमुख कारणे आहेत. यावर पालकांनी लक्ष द्यायला हवे; तर आपण सहजपणे पोटविकारावर मात करू शकतो. बालकांच्या मैदानी खेळाकडेही लक्ष द्यायला हवे.

- डॉ. नितीन तुरस्कर, भंडारा

बॉक्स

कोरोनामुळे मुलांच्या अनेक सवयी बदलल्या आहेत, यात शंका नाही; परंतु बालकांमध्ये पोटविकार ही बाब चांगली नाही. त्यांचे मन परावृत्त करून अन्य बाबींकडे लावायला हवे. खाण्यापिण्याची शिस्त लावावी.

- डॉ. नरेंद्र कुंभरे, भंडारा.

बॉक्स

बालकांना एखादी गोष्ट हवीहवीशी वाटते, तसेच टीव्हीबाबतही आहे. मोबाईल, टीव्ही हे बालकांचे नवीन व्यसनच बनले आहे. त्यामुळे त्यापासून त्यांना परावृत्त करणे गरजेचे आहे. जेवणात सात्त्विक आहाराचा प्रयोग करावा.

- डॉ. अमित कावळे, भंडारा.

Web Title: Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of growing stomach upset!