भंडारा : जिल्ह्यात पुन्हा दोन शिक्षकांना बोगस ठरावावरून नियुक्ती दिल्याचा व त्यांना तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शालार्थ आयडी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूर येथील सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्या काळातील २०२२-२३ मधील हे प्रकरण आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील नवप्रभात शिक्षण संस्थेमध्ये हा गैरप्रकार घडल्याची तक्रार या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी व सचिव हेमंत बांडेबुचे यांनी दिली.
या तक्रारीनुसार, संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे व तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कटारे यांनी बनावट दस्तऐवजाचा आधार घेऊन दोन शिक्षकांची नियुक्ती केली. त्यासाठी २०१७ मध्ये संस्थेने काढलेल्या शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीचा आधार घेतला. तेव्हा या शिक्षकांची संस्थेत नियुक्ती झाली नसतानाही कटारे व डोंगरे यांनी १६ जुलै २०१७ या तारखेचा उल्लेख करून सुरेश चैतराम पटले आणि ईशा सदानंद आगसे या दोन शिक्षकांची नियुक्ती ४/७/२०१७ पासून करण्यास मान्यता देत असल्याचा ठराव घेतला. तसा प्रस्ताव १०/८/२०२२ रोजी विभागीय उपसंचालकांच्या कार्यालयाला पाठविला.
प्रस्ताव नाकारल्यावर पुन्हा सादर केला फेरप्रस्ताव
प्रस्तावाची दखल घेऊन जामदार यांनी १२ त्रुट्या काढून या दोन्ही शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर संस्थेने त्रुट्या पूर्ण करून फेरप्रस्ताव सादर केला. त्यावर २४/५/२०२३ ला मान्यता दिली व ८/४/२०२४ तारखेला त्यांचा शालार्थ आयडी दिला.
शिक्षण विभागात झालेल्या भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, आवश्यकता असल्यासन्यायिक चौकशी करा. अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत. -आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे गट नेते
घोटाळ्यात शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. एसआयटी मार्फत चौकशी केल्यास घबाड पुढे येऊ शकते. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी. -सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार