सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:59 IST2025-11-19T15:57:47+5:302025-11-19T15:59:40+5:30
Bhandara : आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले. हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्राँग रूममधून चोरी केली.

A story befitting a movie ! Bank manager turns thief; 1 crore 58 lakhs stolen from bank under the guise of online gaming
लोकमत न्यूज नेटवर्क
नाकाडोंगरी : तुमसर तालुक्यात सीतासावंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेली १ कोटी ५८ लाख रुपयांच्या चोरीचे प्रकरण पोलिसांनी १२ तासांत उघडकीस आणले. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात बँकेच्या सहायक व्यवस्थापकानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली असून अनेक धक्कादायक बाबीही पुढे आल्या आहेत.
मयूर छबिलाल नेपाळे (३२) असे या सहायक व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथील त्याच्या पत्नीच्या घरातून मंगळवारी अटक केली. गुन्हा केल्यानंतर तो प्रशिक्षणाच्या बहाण्याने नागपूरला पळून गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. सोमवार, १७ नोव्हेंबरच्या रात्री बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये घुसून १ कोटी ५८ लाख ४७ हजार ९४४ रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार १८ नोव्हेंबरला उघडकीस आला होता. त्यामुळे शाखा व्यवस्थापक गणेश सातपुते (३३) यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, बँकेतील संपूर्ण रोख रक्कम, तसेच नऊ सीसीटीव्ही कॅमेरे, एक डीव्हीआर आणि एक संगणक मॉनिटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते.
मयूर नेपाळे याला ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचा छंद होता. यामुळं त्याच्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं. यासोबत अन्य असं लाखो रुपयांचं कर्ज असल्यानं ते परतफेड करण्यासाठी सहाय्यक मॅनेजरनेच बँक लुटली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अशीही चतुराई
आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले. हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्राँग रूममधून चोरी केली. सर्व रक्कम, कॅमेरे, डीव्हीआर घेऊन तो प्रशिक्षणाच्या नावाखाली नागपूरला पत्नीकडे निघून गेला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रक्कम, चारचाकी वाहन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर जप्त केले.