Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 18:12 IST2025-08-01T18:12:10+5:302025-08-01T18:12:59+5:30
Shravan Shanivar 2025: श्रावणातल्या शनिवारी अश्वत्थ मारुति पूजन करण्याची प्रथा आहे, ती कशी करावी आणि त्यामुळे काय लाभ होतो ते जाणून घेऊ.

Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
श्रावणातील प्रत्येक शनिवारी (Shravan Shaniwar 2025)अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. गीतेमध्ये भगवंताने 'अश्वत्थ सर्ववृक्षाणाम' म्हणजे वृक्षांमध्ये जो अश्वत्थ आहे, तो मी आहे, असे म्हटले आहे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध ग्रंथात याबद्दल सविस्तर माहिती मिळते.
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असे म्हणतात. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढेही ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अश्वत्थपूजेला मान असे. यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते.
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे.
एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रगटले. त्यांनी धनंजयाला `तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत' असे सांगितले.
हे ऐकून दु:खी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अश्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. अशी अश्वत्थ पूजेची महती आहे.
August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!
श्रावण शनिवार व्रताचे लाभ
हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या, हे सर्वपरिचित आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते, त्यांनी निदान शनिवारी, विशेषत: श्रावणी शनिवारी अश्वत्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात. तसे करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते.