मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:06 IST2025-08-11T11:53:02+5:302025-08-11T12:06:26+5:30
Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदयाची वेळ काय आहे? जाणून घ्या...

मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ आता अगदी काही दिवसांनी अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे, याची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक मोठ्या गणेश मंडळांमध्ये गणपती आगमन सुरू झाले आहे. गणेशोत्सवाचा उत्साह संचारायला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत असून, श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद, चैतन्य द्विगुणित झाले आहे. अंगारक योग सातत्याने येत नाही. त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीच्या व्रतात पूजन, उपवास यासह चंद्रोदयाला महत्त्व असते. श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ काय आहे? गणेश पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया...
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात.
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग
चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अंगारक म्हणजे मंगळ. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पा मंगलमूर्ती आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाहीत, तरी अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले जाते.
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५
अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ४० मिनिटे.
संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त: बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी मान्यता
अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते. अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
यशोदामातेने केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत
भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते. या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे.
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत गणेश पूजन
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
अहिल्यानगर | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥