Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर॥ यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है। पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है॥ हे शब्द आहेत शंकर महाराज यांचे. योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर म्हाराज त्यांच्या जिवंतपणीच अख्यायिका बनले होते. वैशाख शुक्ल अष्टमी तिथीला शंकर महाराजांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले. यंदा, ५ मे २०२५ रोजी वैशाख शुद्ध अष्टमी आहे. शंकर महाराजांच्या पश्चात आज त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे आणि त्यांच्या विचारांचे पालन करत अध्यात्माची वाट चालत आहे.
कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी. या तिथीला पावन करीत इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री.नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत. महाराष्ट्राला असलेल्या संतपरंपरेतील प्रत्येक संत, योगी यांचे जीवन हे आजही सामान्यांसाठी गूढ आहे. जितके उकलण्याचा प्रयत्न करून तितकेच गुंतागुंतीचे बनणारे, तरिही मनाचा ठाव घेणारे असेच असल्याचे सांगितले जाते.
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ
मोठा भक्त संप्रदाय असणार्या शंकर महाराजांबाबत अनेक अख्यायिका प्रचलित आहेत. शंभर वर्षांहूनही अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते. त्यांच्या जन्मापासूनच अख्यायिका सुरू होतात. महाराजांना अष्टवक्र म्हणून ओळखलं जायचं कारण त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं. महाराज अजानूबाहू होते. त्यांची बसण्याची पध्दतही अनोखी होती. ते गुडघे मुडपून बसत असत. भगवान शंकराप्रमाणेच ते वैरागी होते. महाराजांचे वय काय? हा एक असाच अनिश्चित, अनुत्तरीत प्रश्न. महाराजांच्या भक्तांपैकी एकजण होते पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचं वय १५२ वर्षं असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते थक्क झाले. काही जण म्हणतात महाराज शंभर वर्षं जगले तर काही म्हणतात त्यांनी शंभरावर पन्नसही पार केलेली होती. महाराजांचे वय मात्र त्यांच्या शरीरावर, चेहर्यावर कधीच दिसले नाही.
सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत
प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत, पण त्यांचे श्री ज्ञानेश्वरीप्रेम त्यामानाने जास्त प्रचलित नाही. नगला सरदार मिरीकरांकडे एकदा चालू प्रवचनात स्वत: श्री शंकर महाराजांनी श्री माउलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून लोकांना आश्चर्यचकित केले होते. पुण्याला रावसाहेब मेहेंदळे यांच्या वाड्यात नेहमी चालणाऱ्या ज्ञानेश्वरी चिंतनास श्री शंकर महाराज उपस्थित असत.
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख १३ आहे. महाराजांना १३ हा अंक विशेष प्रिय आहे. याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत; "सब कुछ तेरा, कुछ नही मेरा" हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत. तू तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस. तो तुला भोगलाच पाहिजे. कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही. शंकर महाराजांबाबत दुर्गाष्टमीचे एक विशेष महत्व आहे. शंकर महाराजांबद्दल शंकर महाराज कळण्यासाठी कित्येक जन्म घेतले तरी महाराज काय आहेत कुणाला ही कळणार नाहीत. पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ! वैशाख शुद्ध अष्टमी - दुर्गाष्टमी. सूर्योदयाबरोबर महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली.