पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 07:00 IST2025-10-03T07:00:01+5:302025-10-03T07:00:02+5:30
Pashankush Ekadashi 2025: ३ ऑक्टोबर रोजी पाशांकुश एकादशी आहे, त्यानिमित्त या तिथीचे महत्त्व रामायणातल्या एका प्रसंगामुळे का वाढले आहे ते जाणून घेऊ.

पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे!
दसऱ्याला रावण वध करून प्रभू रामचंद्र परत आले, त्याचा जल्लोष आपण विजयादशमी साजरी करून करतो. रावणाचे दहन आणि प्रभू रामचंद्राचे पूजन करतो. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी अर्थात पाशांकुश एकादशीशी(Pashankush Ekadashi 2025) संबंधित एक रामकथा सांगितली जाते आणि त्या घटनेचे पुरावे आजही सापडतात. ती रामकथा कोणती आणि त्या खुणा कुठे आढळतात, हा सगळा इतिहास जाणून घेऊ.
दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून प्रभू श्रीराम सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतासह दंडकारण्यातून परतले. या दिवसाची भरत अतिशय आतुरतेने वाट पाहत होता. तो दिवस होता पाशांकुश एकादशीचा. म्हणजे आजचा! दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीराम-भरत भेटीचा हृद्य सोहळा या सृष्टीने पाहिला होता. त्या प्रसंगाच्या खुणा आजही चित्रकूट पर्वतावर सापडतात.
या बंधू द्वयींच्या भेटीचे वर्णन वाल्मिकी रामायणापासून ते तुलसी रामायणापर्यंत सर्व ग्रंथात सापडते. ही भेट झाली ते ठिकाण होते श्रीरामांची तपोभूमी चित्रकूट पर्वत. चित्रकूट पर्वतावर स्थित कामतानाथ मंदीर हे श्रीराम भरत मिलाप मंदिर म्हणून उभारले आहे. तिथे श्रीराम आणि भरत यांची पदचिन्हे आढळतात.
दशरथ राजाच्या निधनानंतर भरतानेश्रीरामांची भेट घेतली व आपल्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता त्यांना सांगितली. आईच्या वचनातून मुक्त होऊन त्यांनी पुन्हा राज्य कारभार सांभाळावा अशी भारताने विनवणीदेखील केली. परंतु वचनबद्ध श्रीरामांनी हा प्रस्ताव नाकारला व भरताला अयोध्येचा कारभार सांभाळ असे सांगितले. यावर भरतानेही अयोध्येत राहून वनवासी जीवन व्यतीत केले आणि प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार सांभाळला.
त्यागात पुढे आणि भोगात मागे असणारी ही चारही भावंडे बंधुप्रेमाचे आदर्श उदाहरण होती. त्यावेळेस भरताने प्रभू श्रीरामांकडून वचन घेतले, की चौदा वर्षाचा वनवास संपवून पुढचा दिवस संपायच्या आत तुम्ही परतला नाहीत, तर चित्रकूट पर्वतावर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन.
भरताला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी श्रीराम पुष्पक विमानातून वाऱ्याच्या गतीने लगबगीने परत आले व त्यांनी त्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या भरताला कडकडून मिठी मारली. तो हृदयद्रावक प्रसंग पाहून तिथले दगडही मऊ पडले आणि त्यावर भरत व श्रीरामाच्या पावलाचे ठसे उमटले, असे म्हणतात. आजही तिथल्या मंदिरात हे पदचिन्ह बघायला मिळते. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्या मध्यावर चित्रकूट पर्वत आहे व तिथेच हे मंदिर स्थित आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन पावन व्हा.
अशा बंधुप्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, भगवान विष्णूंची आराधना करून आपणही पाशांकुश एकादशी साजरी करूया. जय श्रीराम!