Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:46 PM2021-10-08T16:46:06+5:302021-10-08T16:48:30+5:30

Navratri 2021 : ब्रह्मचारिणी शक्तीचे स्थान आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्रात आहे व त्या चक्रापाशी जाणीवा नेणीवा नेऊन या शक्तीची साधना केली तर अध्यात्मिकतेची साधना होते व सिद्धिप्राप्त होते. 

Navratri 2021: If you want to achieve victory by keeping your conscience, then worship Goddess Brahmacharyani! | Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!

Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!

googlenewsNext

>> आचार्य विदुला शेंडे

आश्विन शुद्ध द्वितीया म्हणजेच घटाची दुसरी माळ. या दिवशी देवीचे दुसरे रूप `ब्रह्मचारिणी' याची आराधना, साधना केली जाते. ब्रह्म तत्व म्हणजेच वेद व तपाचरण करणे होय. कोणतीही तपस्या करण्यासाठी संयम लागतो व संयामाने इंद्रियनिग्रह होतो व पुन:पुन्हा स्वाध्यायाने, मननाने तपसिद्धी होते. विजय प्राप्त होतो. तपाचरण करणाऱ्याच्या हातात कोणतेही आयुध नसते या प्रमाणेच या देवीच्या हातात कोणतेही आयुध नसते. या देवीच्या एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात जपाची अक्षय माला असते व गळ्यात रुद्राक्षाची माळ असते. 

नारदांनी सांगितल्याप्रमाणे या देवीने शंकर प्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या केली. फळे व नंतर खाली पडलेली बिल्वपत्रे खाऊन तिने तपश्चर्या केली व नंतर तिने ती पाने खाणेही सोडून दिले तेव्हा तिला `अपर्णा' हे नाव मिळाले. तिचे तप चालू असताना प्रचंडासुराने आपल्या सैन्यासह सगळीकडे हल्ला केला होता व तो तिच्यापर्यंत पोहोचणार तोच लक्ष्मी व सरस्वती तिच्या मदतीला आल्या. कारण तिची तपश्चर्या पूर्ण व्हायची होती. पण त्या दोघींना हे असूर मारले जाईनात. तेव्हा या धामधूमीत तिच्या कमंडलूतील पाणी सांडले व त्याच्या सामथ्र्यामुळे महापूर येऊन प्रचंडासुराचे सर्व सैन्य वाहून मेले व ब्रह्मचारिणीने अर्धे नेत्र उघडले त्या तप:सामर्थ्याने त्यांच्या ज्वाळात प्रचंडासूर जळून मेला. 

ब्रह्मचारिणी शक्तीचे स्थान आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्रात आहे व त्या चक्रापाशी जाणीवा नेणीवा नेऊन या शक्तीची साधना केली तर अध्यात्मिकतेची साधना होते व सिद्धिप्राप्त होते. 

ब्रह्मचारिणी ही देवी पायांवर उभी आहे कारण तिला तपाचरण  करायचे आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या भक्तीने परिपक्वता, ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानानुसार आचरण म्हणजेच विवेक. कुठे काय, का, केव्हा व कसे करावे, अशा ज्ञानी विवेकाची आजच्या जगात तर खूपच आवश्यकता आहे. हेच खरे संरक्षक कवच आहे. 

ब्रह्माचरण म्हणजेच नीती नियमांचे पालन. त्यामुळेच या शक्तीच्या उपासनेने सर्जनशीलता निरोगी जीवन, इमानदार व नैतिक चारित्र्य व आनंददायी आयुष्य होते. ब्रह्म तत्त्व हे सगळ्या चराचरात राहिलेले म्हणजेच इन्फीनिटी आहे. `ब्रह्म चारयितुं शीलं यस्य: सा ब्रह्मचारिणी' या शक्तीमुळे आपले मनोदौर्बल्य जाते. विविध क्षमता जागृत होतात, उदात्तता येते व समरसतेकडे प्रवास चालू होतो. 

या शक्तीसाधनेचा बीजमंत्र अगदी सोपा व सहज म्हणता येण्यासारखा आहे. 
ऊँ ऐं ऱ्हीम क्लीं चामुण्डायै विचै
ऊँ ब्रह्मचारिणी रुपेण संस्थित:
नम:स्तस्यै नम:स्तस्यै नम:स्तस्यै नमो नम:।

स्वाधिष्ठान चक्र जिथे ब्रह्मचारिणी शक्तीची आराधना केली जाते, ते सृजन, नवनिर्मिती, नवज्ञान, प्रज्ञा, नवकल्पनांचे स्थान आहे. ज्यामुळे स्वत:च्या खऱ्या ओळखीकडे, मी कोण? हे फक्त उपभोगासाठी नाही तर त्यागासाठी, दानासाठी व ब्रह्म साधनेसाठी आहे, हे समजते. योग्य वयात, योग्य वेळी, योग्य गोष्टी करून मानव निर्मोही होतो. 

Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!

या शक्तीचे तत्त्व जलतत्त्व आहे. जे सगळ्यांना आपल्यात मिसळून घेऊन स्वत:सारखे स्वच्छ, निर्मळ बनवते व त्रिगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल होते. अहंकार नष्ट झाल्यामुळे विकार नाहीसे होतात व माणूस आत्मोन्नतीकडे जातो. जीवनातली खरी समृद्धी कळते व आयुष्य आनंदमय होते. आपण सगळे जण ही साधना, शक्ती जागरण करूयात आणि निर्मोही होऊयात.

Web Title: Navratri 2021: If you want to achieve victory by keeping your conscience, then worship Goddess Brahmacharyani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.