Narasimha Jayanti 2025: नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये; आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:27 IST2025-05-08T16:26:40+5:302025-05-08T16:27:06+5:30

Narasimha Jayanti 2025:३ मे रोजी सुरु झालेली नृसिंह नवरात्र ११ मे रोजी नृसिंह जयंतीला पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने भगवान नृसिंह जिथे प्रगटले, तिथला स्थानमहिमा जाणून घ्या!

Narasimha Jayanti 2025: The original pillar of Narasimha Avatar, in Multan, Pakistan; Where is the idol now? | Narasimha Jayanti 2025: नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये; आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या!

Narasimha Jayanti 2025: नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये; आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या!

>> मकरंद करंदीकर

गुढी पाडव्याला शालिवाहन शके म्हणजे हिंदू नववर्षाला सुरुवात होते. एक वैशिष्ट्य असे आहे की ( वैशाख पौर्णिमेपर्यंत ),भगवान विष्णूच्या एकूण १०अवतारांपैकी, आजवर झालेल्या ९ अवतारांमधील ६ अवतारांचा जन्म याच काळात झालेला आहे. त्यातील नृसिंह जयंती(Narasimha Jayanti 2025) येत्या रविवारी ११ मे आणि बुद्ध आणि कूर्म जयंती(Buddha Purnima 2025) सोमवारी १२ मे राजी आहे.

भगवान नृसिंह हे सर्वसाधारणपणे उग्र ( कृद्ध होऊन हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असताना ) आणि शांत (लक्ष्मीच्या सानिध्यात शांत बसलेले) अशा दोन रूपात प्रामुख्याने पाहायला मिळतात. भगवान नृसिंहाची मंदिरे जरी तुलनेने कमी असली तरी ते लाखो कुटुंबांचे कुलदैवत आहे.

आपल्या भक्ताला, प्रल्हादाला वाचवण्यासाठी ते एका स्तंभातून अवतरले. त्यांचा हा अवतार कुठे झाला ? तो स्तंभ कुठे आहे ? अशा पुराणातील गोष्टींचा आपण फारसा विचार करीत नाही. पण हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी याना पडला होता. त्यांचे कुलदैवत असलेल्या नृसिंहानेच त्यांच्या मनात हा विचार पेरला असावा. याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अद्वैत आणि त्यावेळी अमेरिकेत असलेले चिरंजीव अभिजित यांनी अपार मेहेनत घेतली. 

या अवताराचे मूळचे स्थान पाकिस्तानातील मुलतान ( मूलस्थान ) हे आहे, याचा शोध लागला. सगळे जुने नवे संदर्भ शोधणे, मुद्दाम नष्ट केलेली तेथील माहिती पुन्हा शोधणे, तेथील जाणकारांची माहिती मिळविणे, संपर्क साधणे, धार्मिक आणि राजकीय कट्टर विरोधाला तोंड देत यांचा निर्णायक शोध घेणे अशा एकाहून एक कठीण पायऱ्या त्यांनी चढायला सुरुवात केली. कधी स्वप्नात तर कधी प्रत्यक्षात मार्गदर्शन लाभत गेले. तेथील इर्शाद हुसेन गर्देजी यांनी त्यांना सातत्याने मदत केली. अनंत जोशी यांनी मुलतान येथे होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने व्हिसा मिळवून, तेथे  जाऊन या स्थानाचे दर्शन घेतले. त्या ( भग्न, उध्वस्त ) मंदिरात जाऊन दुभंगलेला स्तंभ पाहिला. तेथील एक वीट आणि थोडी माती पुण्याला आणली. (या मातीतून त्यांनी तेथील स्तंभाची छोटी प्रतिकृती बनवली आहे. तर पुण्यातील मंदिराच्या दुरुस्तीत येथील वीट वापरली आहे.) तेथील अनेक माहितगार, मशिदी, वाचनालये, गुरुद्वारा यांना भेट देऊन माहिती मिळवली. गहाळ झालेले अनेक संदर्भ मिळविले. 

नृसिंह प्रकटण्याचा मूळचा स्तंभ सोन्याचा होता. पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपुरा असे नाव होते. विष्णूचा वामन अवतारही याच भागात झाला. तेथील अली बिन अहमद बिन अबू बकर कुटी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात महम्मद बिन कासीम याने हे देऊळ लुटले तेव्हा येथील १३,२०० मण सोने लुटून नेल्याचा उल्लेख आहे.  

तेथील प्रचंड माहिती, फोटो, मंदिरातील एक पवित्र वीट आणि माती हे सर्व घेऊन श्री.जोशी पुण्याला परतले. नंतर त्यांनी  मुलतानच्या त्या मंदिरातील मूळची मूर्ती कुठे गेली असावी, ती आजही अस्तित्वात असेल का या प्रश्नांचा शोध घेणे सुरु केले. नंतर त्यांनी हे शोधून काढले की, पाकिस्तानमधून नाना क्लृप्त्या लढवून नारायणदास बाबांनी ही मूळ मूर्ती सुरक्षितपणे हरिद्वारला आणून तिची स्थापना केली आहे. या सगळ्या अभूतपूर्व घटनांची माहिती देणारे " मुलस्थानाचा ध्यास " हे एक पुस्तकच अनंत जोशी यांनी लिहिले असून ते पुण्यातील सदाशिव पेठेतील त्यांच्या २५० वर्षे जुन्या नृसिंह मंदिरात उपलब्ध आहे. 

यात आणखी एक महत्वाचे प्रकरण आहे. त्यांच्या १० पिढ्यांपूर्वीच्या गणेश दीक्षित उर्फ जोशी व त्यांची सौ. यांनी इ.स. १७७४ मध्ये पुण्याहून, केवळ भक्तीची आस आणि स्वप्नातील दृष्टांताच्या आधारे काशीला  जाऊन नृसिंहाची स्वयंभू मूर्ती शोधून काढली. ही मूर्ती ते दांपत्य २५० वर्षांपूर्वी काशीहून अयोध्या,जगन्नाथपुरी, नाशिक अशा मार्गाने पुण्याला घेऊन आले. बहुतांश वेळ त्यांनी ही मूर्ती स्वतःच्या डोक्यावरून, खांद्यावरून वाहून आणली. मूळ पुस्तकातील हा सर्व प्रवास, सध्याच्या  मंदिराची उभारणी, अत्यंत नामवंतांनी  मंदिराला दिलेली भेट, हे समग्र वर्णन  वाचण्यासारखे आहे. येत्या नृसिंह जयंतीच्या निमित्ताने, या देवाइतकीच त्याच्या शोधाची ही अद्भुत माहिती!

(माहिती सौजन्य - कै. अनंत जोशी यांनी लिहिले " मुलस्थानाचा ध्यास " हे पुस्तक आणि त्यांचे चिरंजीव श्री.अभिजित जोशी.)

संपर्क : makarandsk@gmail.com

Web Title: Narasimha Jayanti 2025: The original pillar of Narasimha Avatar, in Multan, Pakistan; Where is the idol now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.