Marriage Astro: विवाह योग पुरेसा नाही, ग्रहदशाही महत्त्वाची; अन्यथा विवाहात येतात 'या' अडचणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:47 IST2026-03-07T11:45:45+5:302026-03-07T11:47:35+5:30
Marriage Astro Tips: विवाह होण्यापासून तो टिकवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक होऊ लागल्या आहेत, अशातच योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर संसाराची वाताहत होते.

Marriage Astro: विवाह योग पुरेसा नाही, ग्रहदशाही महत्त्वाची; अन्यथा विवाहात येतात 'या' अडचणी!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या मनासारखा जोडीदार मिळणे आणि आयुष्याचा प्रवास सुकर होणे, यासाठी खरंच भाग्य आणि पूर्वपुण्याई लागते. आजकालची परिस्थिती बघता, याचा पदोपदी प्रत्यय येतो. आयुष्यात विवाहाचा योग अनेकदा येतो, पण 'दशा' अत्यंत महत्त्वाची असते. कित्येक वेळा गुरु, रवी लग्नातून किंवा सप्तम भावातून भ्रमण करतात, तरीही विवाह होत नाही; याला कारण असते दशास्वामीची राजमर्जी. दशा अनुकूल असेल तरच घटना घडणार, अन्यथा नाही.
तृतीय किंवा अष्टम भाव चालतील, पण षष्ठ भाव (सहावे स्थान) हा जोडीदाराशी ताटातूट दर्शवतो. त्यामुळे षष्ठ भावाच्या स्वामीची दशा विवाहाला अनुकूल नसते. षष्ठ भावाचा स्वामी व्यय भावात जाणे म्हणजे 'आगीतून फुफाट्यात पडण्या'सारखे आहे. त्यात वैवाहिक सुखाचा कारक शुक्र मकर राशीत आणि मकर नवमांशात असेल, तर अडचणी वाढतात. अनेकदा अशा पत्रिकांमध्ये "फक्त आई-वडील सांगत आहेत म्हणून विवाह करायचा आहे, स्वतःला इच्छा नाही," असे जातकाच्या बोलण्यातून जाणवते.
अनेकदा विवाहाचे वय असताना नेमकी त्याच काळात जर षष्ठेशाची दशा आरंभ झाली, तर ती संपूर्ण दशा सोडून द्यावी लागते; मग ती कुठल्याही ग्रहाची असो. दशा कुठल्या भावांचे फल देणार आहे, याचा अभ्यास न करता केवळ "गुरु लग्नी आला म्हणून विवाह होणार" हे भाकीत चुकू शकते, नव्हे ते चुकतेच.
६, ८, १२ च्या दशा; त्यात बुधाची दशा, सप्तमातील हर्शल, नेपच्यून, प्लुटो, नुसता वक्री हर्शल किंवा प्लुटो, व्यय भावातील शनी-बुध सारखे नपुंसक ग्रह आणि कमकुवत शुक्र—यांचे एकत्रित फळ विवाह योग पुढे ढकलतात किंवा विवाह योग देतच नाहीत.
खरं सांगायचे तर, अशा मुलांच्या पालकांना कसे समजवायचे, हा एक मोठा प्रश्न असतो. पण काय करणार? आपल्या हाती काहीही नाही. अशा गोष्टींसाठी उपाय तरी काय सांगणार? काही प्रारब्ध भोग आहेत, ते भोगूनच संपवायचे असतात. देवाने आपल्या आयुष्यातील कुठला ना कुठला कोपरा रिता ठेवला आहे, त्यामुळे जे आहे ते स्वीकारून आयुष्य जगण्याची कला अवगत करता आली पाहिजे. हे सांगायला सोपे असले, तरी प्रत्यक्षात कठीण असते.
समुद्रिक शास्त्र: संघर्ष की राजयोग? 'दातावर दात' असणाऱ्या लोकांच्या नशिबाचा खेळ आणि त्यामागील सत्य
व्यय भाव हा 'शय्यासुखाचा' देखील आहे. काही पत्रिकांत शनी-बुध किंवा केवळ बुध (अस्तंगत, वक्री) असताना विवाहाची किंवा कामसुखाची इच्छा जातकामध्ये नसते, असे अनुभवास येते. अनेक पत्रिकांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, ३० गुण किंवा २८ गुण जुळतात म्हणून विवाह होतो किंवा विवाह होतो त्यावेळी असलेली दशा अनुकूल असते. पण पुढे येणारी दशा जर षष्ठ भावाशी निगडित असेल, तर तोपर्यंत दाखवलेला सगळा समजूतदारपणा अचानक गायब होतो आणि मग संसारात धुमश्चक्री सुरू होते.
म्हणूनच दोघांच्याही पत्रिकेतील पुढील २५-३० वर्षांच्या ग्रहदशा बघितल्याच पाहिजेत. आनंद मिळाला, पण तो चिरकाल टिकणारा नसेल तर काय उपयोग? आपण नक्कीच माझ्याशी सहमत असाल. आजकाल विवाहाचे वय खूप पुढे जात आहे, पण त्याहीपेक्षा विवाहाला ३०-४० वर्षे झालेली असूनही घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी!
दशांचा अभ्यास हवाच; तो नसतो म्हणूनच मग विवाहानंतर अगदी काही दिवसांत, महिन्यांत किंवा वर्षांत घटस्फोट घेतल्याचे दिसून येते. अनेकदा काही जातक षष्ठ भावाच्या अधिपतीचे रत्न घालून ठेवतात, त्यामुळे विवाह होण्याऐवजी त्याची नकारात्मक फळे वाढीस लागतात. असो.