११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:48 IST2026-01-13T10:42:19+5:302026-01-13T10:48:33+5:30
Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला ६ गोष्टी करणे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. यंदा २०२६ ला संक्रमण पुण्यकाल कधी आहे? जाणून घ्या...

११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
Makar Sankranti 2026: इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, पहिला मोठा सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर विविध स्वरुपात मकर संक्रांती साजरी केली जाते. यंदा २०२६ च्या मकर संक्रांतीला षट्तिला एकादशीचा योग जुळून आलेला आहे. सुमारे ११ वर्षांनी असा योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. मकर संक्रांतीला संक्रमण पुण्य काळाला महत्त्व असते. जाणून घेऊया...
बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण म्हणजे मकर संक्रांत. भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत होय. सर्वसाधारणपणे मकरसंक्रांती १४ जानेवारी रोजी येते. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले. आपल्या मराठीत ‘एक तीळ सातजणांनी वाटून खावा’ अशी एक म्हण आहे ही म्हण आपल्याला समानतेचा, समतेचा संदेश देते.
भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो
भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात या दिवशी खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला ‘खिचडी संक्रांती’ असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये काकवीत तीळ घालून बनलेला ‘तिळुआ’ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूपसाखर घालून केलेला ‘पिष्टक’ नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ व ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्र पोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. गुजरातमध्ये संक्रातीच्या दिवशी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष सारी मंडळी पहाटेपासून रात्रीपर्यंत पतंग उडविण्यात दंग असतात. या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते.
महाराष्ट्रात तीन दिवस मकर संक्रांत सण
महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीने किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो. मकर संक्रमणापेक्षा उत्तरायण आरंभ ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे. सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळ-गूळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे, काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरू झाल्या. कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकलेले धान्य, फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले. संक्रांत म्हणजे संक्रमण. ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकरसंक्रातीला दान करणे, गंगा स्नान करणे शुभ मानले गेले आहे.
‘तीळगूळ घ्या गोड बोला’
महाराष्ट्रात सवाष्णी सुघड पूजन करून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. घरी, देवळात हळदीकुंकू समारंभही केले जातात. आपल्याकडे तीळगूळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन ‘तीळगूळ घ्या गोड बोला’, असा स्नेहाचा संदेश दिला जातो. तिळगूळ हा मोठ्यांनी लहानांना द्यावयाचा असा संकेत आहे. जुना वैरभाव, अबोला, दुरावा, राग विसरुन नातेसंबंध पुन्हा एकदा नव्याने दृढ करण्याची गोड संधी तिळगुळाच्या निमित्ताने सर्वांनाच मिळते. कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. ग्रामस्थ मंडळी देवीला तीळगूळ द्यायला येतात. देवीच्या ओटीच्या साहित्यात गहू किंवा तांदळांबरोबर उसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेगा असे पदार्थही असतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. कोकणात काही कुटुंबांत दुसऱ्याच्या घरातील आधणात आपल्या घरचे तांदूळ नेऊन वैरण्याची प्रथा होती तसेच शेजारच्या घरी उंबरठ्याच्या आत खेळणा-रांगणा म्हणून असोला नारळ सोडला जातो.
मकर संक्रांतीला काळ्या वस्त्रांचे महत्त्व
संक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात.एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.
मकर संक्रांतीला लहान मुलांचे 'बोर न्हाण'
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळे झबले, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्या पदार्थांचा अभिषेक केला जातो.
मकर संक्रांत आणि पतंगोत्सव
भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते, असे नाही. वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात. रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. त्यामुळेच मकरसंक्रांतीला तिळगूळ खाण्याला महत्त्व असते. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.
२०२६ मध्ये मकर संक्रांत संक्रमण पुण्य काल कधी?
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. या दिवसापासून सूर्य मकर राशीत भ्रमण करू लागतो. तोपर्यंत जे दिवस थंडीने लहान झालेले असतात, ते संक्रांतीपासून तिळातिळाने वाढू लागतात. बुधवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत असून, संक्रमण पुण्यकाल दुपारी ०३ वाजून ०६ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी घरच्या आणि गावच्या देवांना तीळ-तांदूळ वाहण्याचीही प्रथा आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो. त्याच्या तऱ्हा भिन्न असल्या तरीही उद्देश सूर्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणे; तसेच आपापसातील स्नेहभाव वृद्धिंगत करणे हाच असतो. या सणाचे विशेष म्हणजे मकरसंक्रांती हा सण एकदोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमीपर्यंत म्हणजेच रथ सप्तमीपर्यंत दीर्घकाळ चालणारा सण आहे.
सहा गोष्टी मकरसंक्रात दिवशी करण्यास विशेष महत्त्व
- तीळ वाटून अंगाला लावणे.
- तीळ घातलेल्या पाण्याने स्नान करणे.
- तीळ होम करणे.
- पितरांना तिलोदक देणे.
- तीळ खाणे.
- तीळ दान देणे.