Mahakumbh Mela 2025: १४४ वर्षांनी जुळून आला महाकुंभमेळ्याचा योग; याची पुनरावृत्ती थेट २२ व्या शतकात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:17 IST2025-01-01T11:15:41+5:302025-01-01T11:17:37+5:30
Mahakumbh Mela 2025: शतकातून एकदा येणारा महाकुंभ मेळ्याचा योग आणि आपण आहोत या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार; जाणून घ्या इतिहास आणि वर्तमान!

Mahakumbh Mela 2025: १४४ वर्षांनी जुळून आला महाकुंभमेळ्याचा योग; याची पुनरावृत्ती थेट २२ व्या शतकात!
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा! यावर्षी महाकुंभमेळा कधी सुरु होणार तसेच शाही स्नान कोणत्या दिवशी आणि मुख्य म्हणजे या उत्सवाला सुरुवात कधी आणि कशी झाली त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान, दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभ होतो. कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते. कालचक्रमध्ये ग्रहांचा राजा, सूर्य, राणी चंद्र आणि ग्रहांचा गुरू गुरू याला महत्त्वाचे स्थान आहे. या तीन ग्रहांचे विशिष्ट राशींमध्ये होणारे संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो. प्रयागराजमध्ये, गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने, माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो.
महाकुंभमेळ्याच्या मुख्य तारखा जाणून घेऊ :
⦁ पौष पौर्णिमा - १३ जानेवारी २०२५, सोमवार, कुंभमेळा प्रारंभ
⦁ मकर संक्रांति - १४ जानेवारी २०२५, मंगळवार, शाही स्नान
⦁ मौनी अमावस्या - २९ जानेवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ बसंत पंचमी - ३ फेब्रुवारी २०२५, सोमवार, शाही स्नान
⦁ माघ पौर्णिमा - १२ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ महाशिवरात्रि - २६ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली :
असे सांगतात, की अगस्ती ऋषीनी दिलेल्या शापामुळे देव शक्तीहिन झाले. मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली.
समुद्र मंथन बारा दिवस चालले, ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होत. अमृत प्राप्त झाले, ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृतकुंभ घेऊन पलायन केले. या पलायना दरम्यान ते ज्या ठिकाणी लपलेती चार ठिकाणं म्हणजे हरी द्वार,प्रयाग ,उज्जैन व नाशिक!
या ठिकाणी हे अमृतकुंभ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले. या चार ठिकाणी देव ज्या वेळी थांबले त्या वेळी असणारे ग्रहमान लक्षात घेऊन त्या योगावर पुढे कुंभमेळा भरु लागला!
रवी, चंद्र व गुरु हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा भरतो. कधी सहा वर्ष, तर कधी बारा वर्ष, तर कधी १४४ वर्षांनी हे योग येत असतात. आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा म्हणतात. जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पुर्ण कुंभ म्हटला जातो आणि आणि असा योग जर १४४ वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा म्हटला जातो.
१३ जानेवारी रोजी येणारा नवीन वर्ष २०२५ मध्ये प्रयाग येथे महाकुंभ मेळा भरणार आहे. कारण हा योग्य १४४ वर्षांनी जुळून आला आहे. आता या पुढे हा योग २२ व्या शतकात येणार आहे. आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होत आहोत. हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खुपच भाग्यदायी आहे आणि तेही प्रयाग या स्थळी! प्रयागला एवढे महत्त्व का? तर ब्रम्हदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता! प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले....
या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्वकाळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते, कळतनकळत केलेली पापे नष्ट होतात.....मोठमोठ्या तपस्वी, साधूसंत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास सिद्धी व साधनेचे फळ मिळते. या कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी पुण्य मिळते.
पर्वकाळात तपस्वी, साधूसंत यांचाच मान व अधीकार असतो, त्यात आपण गर्दी न कलेलीच बरी! त्यामुळे वर्षभरात आपल्याला तिथे जाता येऊ शकते. वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नान संध्या करावी. तसेच पर्वकाळात पिंडदान, श्राद्धकर्म करण्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते.
चला तर या सुवर्ण क्षणाचे आपणही साक्षीदार होऊया!