१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:11 IST2025-08-12T15:09:52+5:302025-08-12T15:11:19+5:30
Shri Krishna Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जाणून घ्या...

१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
Shri Krishna Janmashtami 2025: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. श्रावण नारळी पौर्णिमा झाली की, सर्वांनाच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे वेध लागतात. संपूर्ण देशात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. परंतु, यंदा मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे, याबाबत गोंधळाची स्थिती असल्याचे म्हटले जात आहे.
बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. सन २०२५ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कधी करावे? जाणून घेऊया...
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी?
श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला, असे मानले जाते. १४ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री ०२ वाजून ०७ मिनिटांनी श्रावण षष्ठी समाप्त होत आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत असून, श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे. तर, १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ३४ मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते. त्यामुळे हा योग १५ ऑगस्ट २०२५ रात्री जुळून येत आहे. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला साजरा केला जात आहे. मुंबईत दहीहंडीची धूम असणार आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.