Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:56 PM2021-08-21T15:56:17+5:302021-08-21T15:57:18+5:30

Janmashtami 2021: पुन्हा एकदा काळाची गरज ओळखून आजच्या मोबाईलयुगात स्वत:ला आणि इतरांना अशा कार्यासाठी एकत्र करणे गरजेचे आहे.

Janmashtami 2021: Shrikrishna Navratra starting from 3rd Shravan Monday; Learn how they celebrate! | Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

googlenewsNext

आपण देवीची नवरात्र ऐकली आहे, रामाची नवरात्र ऐकली आहे, खंडोबाची नवरात्र ऐकली आहे, पण श्रीकृष्णाचीही नवरात्र असते, हे अनेकांनी प्राथमच ऐकले असेल. याचे कारण एकच, की कालौघात अनेक व्रत कालबाह्य झाल्यामुळे आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. श्रीकृष्ण नवरात्र आपल्यासाठी नवीन असली, तरी कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला होतो व दुसऱ्या दिवशी हंडी फोडून काला करून उत्सवाची सांगता होते, हे तर आपल्याला माहीत आहेच! याचाच पूर्वार्ध म्हणजे श्रीकृष्णाची नवरात्र! 

गोकुळाष्टमीचा उत्सव कथा कीर्तनाने आठ दिवस आधी सुरू होऊन अष्टमीला कृष्णजन्म आणि नवमीला काल्याचे कीर्तन होत असे. आजही काही मंदिरांमध्ये चातुर्मासाची, श्रावण महिन्याची नाहीतर अष्टमीतल्या सप्ताहाची कीर्तने आयोजित केली जातात. त्या कीर्तनांमधून या नवरात्रीबद्दल तसेच या उत्सवाबद्दल सविस्तर माहिती कळते. आता जेमतेम उत्सवाची कीर्तनं होतात आणि हंडीसाठी लोक उत्सुक असतात. त्यामुळे माहितीचा स्रोत आटून गेला. यासाठीच लोकमत भक्तीच्या माध्यमातून व्रत वैकल्यांना, उत्सव, परंपरेला पुनरुज्जीवन देण्याचा अल्प प्रयत्न!

गोकुळाष्टमी नवरात्र- श्रावण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र करतात. मात्र ते महाराष्ट्रात अधिककरून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांच्या घरी काही कुळांमध्ये करण्याची प्रथा आहे. या नवरात्रात भागवत सप्ताह केला जातो. ते शक्य नसल्यास भागवताच्या एखाद्या स्कंधाचे या पठण श्रवण केले जाते. अथवा अखंड नामसप्ताह, कीर्तनाचे आयोजन केले जाते. अनेक कृष्ण मंदिरात तसेच विठ्ठल मंदिरातही हे नवरात्र उत्साहाने साजरे होते. याची समाप्ती गोपाळकाल्याने होते. भंडारा मात्र बहुतेक ठिकाणी असतो.

पूर्वापार हे व्रत फक्त काही कुळांपुरतेच मर्यादित आहे. परंतु अलिकडे कृष्णभक्ती करणारे अनेक भाविक हे व्रत करतात. सध्याच्या धवापळीच्या काळात भागवत सप्ताह करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु सामुहिक पद्धतीने एकत्र होऊन सप्ताहाचे आयोजन केले, तर तेही निश्चित जमू शकते. 
असे कार्यक्रम विधीचा, पूजेचा एक भाग किंवा सोपस्कार नाही, तर या गोष्टी आपल्या मनाला प्रसन्नता, उभारी देण्यासाठी आहेत. या निमित्ताने समाजाचे एकत्रीकरण होते, अंतर्गत मतभेद दूर होतात, भांडण मिटून स्नेहभोजन होते. गप्पा रंगतात. यांत्रिक युगात जगत असलेल्या मानवाला चार घटका माणसांचा सहवास मिळतो आणि माणूस खऱ्या अर्थाने माणसाळतो. 

अशा संधी न दवडता, निमित्त शोधून संघटित होण्याची गरज आहे. ही एकजूट सणाच्या निमित्ताने झाली, तरच संकटप्रसंगीदेखील कामी येईल. लोकमान्यांनी हेच तंत्र वापरून गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सार्वजनिक रूप दिले. पुन्हा एकदा काळाची गरज ओळखून आजच्या मोबाईलयुगात स्वत:ला आणि इतरांना अशा कार्यासाठी एकत्र करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना हातभार लागेल, स्थानिकांना रोजगार मिळेला, मुलांना वृद्धांना विरंगुळा मिळेल आणि पुढच्या पिढीच्या हाती नकळत संस्कृतीचे हस्तांतरण होईल. 

Web Title: Janmashtami 2021: Shrikrishna Navratra starting from 3rd Shravan Monday; Learn how they celebrate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.