Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:41 IST2026-02-24T10:29:33+5:302026-02-24T11:41:19+5:30
Holi Dhulivandan 2026 Date: फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो, पण यंदा चंद्र ग्रहण त्याच काळात असल्यामुळे होळी २ मार्चला साजरी करावी की ३ ला, याबाबत जाणून घ्या.

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा
होळी (Holi 2026) हा रंगांचा आणि उत्साहाचा सण जवळ येत आहे. मात्र, यावर्षी तिथी आणि चंद्र ग्रहणाच्या स्थितीमुळे होलिका दहनाच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यावर्षीच्या होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केले आहे. यावर्षी सोमवार, २ मार्च रोजी होलिका दहन (Holika Dahan 2026) केले जाणार असून मंगळवार, ३ मार्च रोजी धूलिवंदन (Dhulivandan 2026) साजरे होईल.
२ मार्चलाच होलिका दहन का?
दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार, ज्या दिवशी प्रदोष काळात (सूर्यास्तानंतरची वेळ) पौर्णिमा असते, त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. यावर्षी हा योग २ मार्च रोजी जुळून येत असल्याने याच दिवशी होळी पेटवली जाईल.
३ मार्चचे 'चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2026) आणि शास्त्राधार
मंगळवार, ३ मार्च रोजी 'ग्रस्तोदित चंद्रग्रहण' आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमांनुसार, जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल, तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते. म्हणूनच, ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता, सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे.

भद्रा काळातही होलिका दहन (Holi 2026 Date) शक्य?
अनेकांना असा प्रश्न पडतो की भद्रा काळात शुभ कार्ये टाळावीत, मग होळीचे काय? यावर स्पष्टीकरण देताना सोमण म्हणाले की, "सोमवारी २ मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा असली तरीही, त्या काळात होलिका दहन करता येते." त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन होळी पेटवता येईल.
धूलिवंदन आणि रंगपंचमी (Dhulivandan And Rang Panchami Date 2026)
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, ३ मार्च रोजी 'धूलिवंदन' असेल. मात्र, या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन नागरिकांनी सण साजरा करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.