Holi 2025: महाराष्ट्रात होळीचे हटके रंग, विविध पद्धतींनी साजरा होतो सण; शिमग्याच्या नाना छटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 09:46 IST2025-03-10T09:43:47+5:302025-03-10T09:46:12+5:30
Holi 2025: संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा केला जात असला, तरी महाराष्ट्रात या सणाच्या पद्धती, परंपरा यात वैविध्य आढळून येते. जाणून घ्या...

Holi 2025: महाराष्ट्रात होळीचे हटके रंग, विविध पद्धतींनी साजरा होतो सण; शिमग्याच्या नाना छटा
Holi 2025: मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळात होळी आणि धूलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात विविध पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया...
गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
कोकणात होळीच्या सणाचे महत्त्व
होळी सणाला 'होलिकादहन', 'होळी', 'शिमगा', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा', 'कामदहन' अशी विविध नावे आहेत. कोकणात याला 'शिमगो' म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त 'वसंतोत्सव' असेही म्हटले जाते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच 'शिमगा' असा अपभ्रंश तयार झाला असावा, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे १५ दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला 'भद्रेचा होम' असे म्हटले जाते.
रांगोळ्या, पताका, फुलांची आरास होळीचा सण खास
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. यानंतर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात. चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. दापोलीतील आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटला जातो. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हटली जातात.
पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण होळीचा आनंदोत्सव
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो.
ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा
कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत. ती परंपरा या गावात जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात 'जती'च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
विदर्भात परंपरा, विविध पद्धतीने होळी सण होतो साजरा
होळी साजरी करताना आदिवासी बांधव गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असलेले भोजन करतात. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीदरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पारंपरिक आणि विविध पद्धतीने होळी साजरी केली जाते.