Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:59 IST2026-01-13T16:02:59+5:302026-01-13T17:59:01+5:30
Bornhan on Makar Sankranti 2026: यंदा १४ ते २५ जानेवारी अर्थात मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तान्ह्या बाळाचे तसेच ५ वर्षांखालील मुलांचे बोरन्हाण करता येणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती.

Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
Bornhan Importance in Marathi:मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात घराघरात लहान मुलांचे 'बोरन्हाण(Bornhan 2026) घातले जाते. हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून, तो मुलांवर केला जाणारा एक महत्त्वाचा शिशुसंस्कार आहे. निसर्गाशी आणि बदलत्या ऋतूंशी बाळाची नाळ जोडण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
बोरन्हाण म्हणजे नक्की काय? का घालतात? (Why to Celebrate Borhnhan)
आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर बाह्य सृष्टीतील ऋतूमानाशी जुळवून घेण्याची ताकद बाळाला मिळावी, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असतो. हिवाळ्यातील आरोग्यदायी फळांचा 'अभिषेक' बाळावर घालून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.
बोरन्हाणची तयारी आणि सजावट (How to celebrate Borhnhan?)
बोरन्हाण घालताना बाळाचा साज विशेष असतो:
पोशाख: थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून बाळाला काळ्या रंगाचे कपडे (झबले, सदरा किंवा परकर-पोलके) घातले जातात. शास्त्रानुसार काळा रंग उष्णता शोषून घेतो.
दागिने: काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने बाळाला घातले जातात. मुलांना मुकुट, बासरी, हार तर मुलींना नथ, कंबरपट्टा, बांगड्या अशा दागिन्यांनी सजवले जाते.
मकर संक्रांती २०२६: सुगड पूजनाशिवाय संक्रांत अपूर्ण! वाचा साहित्य, शास्त्रोक्त विधी आणि शुभ मुहूर्त
बोरन्हाणचा विधी: कसा करावा 'खाऊचा वर्षाव'?
बाळाला पाटावर बसवून त्याचे औक्षण केले जाते. त्यानंतर बाळाच्या डोक्यावरून खालील गोष्टींचे मिश्रण हळूवारपणे ओतले जाते (ज्यामुळे बाळाला लागणार नाही)
१. आरोग्यदायी गोष्टी: बोरं, ऊसाचे कापे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे आणि लाह्या.
२. मुलांच्या आवडीच्या गोष्टी: हलव्याचे दाणे, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स आणि बिस्किटे.
हा सर्व खाऊ गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावले जाते. मुलांची ही झुंबड आणि खाऊ वेचताना होणारा आनंद सोहळ्याची रंगत वाढवतो.
बाळाच्या बोरन्हाणासाठी करा मायेनं डेकोरेशन, ६ सोप्या आयडिया-कमी वेळात घर सजेल सुंदर.
सामाजिक महत्त्व
या निमित्ताने लेकुरवाळ्या स्त्रियांना बोलावून त्यांचे हळद-कुंकू केले जाते. एकमेकींच्या भेटीगाठी, गप्पा आणि गाण्यांमुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. मुलांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होण्यासाठी हा पाया असतो.