Astrology: सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश: सुट्टीवर गेलेला पाऊस परतणार, श्रावणधारा बरसणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:14 IST2025-07-17T18:13:20+5:302025-07-17T18:14:48+5:30
Astrology: गेले काही दिवस अनेक ठिकाणी रजेवर गेलेला पाऊस आता पुन्हा जोमाने बरसणार; हे हवामान खात्याचे भाकीत नाही, तर आहेत पंचांगाचे संकेत.

Astrology: सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश: सुट्टीवर गेलेला पाऊस परतणार, श्रावणधारा बरसणार!
यंदा पावसाने मे महिन्यातच एंट्री घेतली. त्यामुळे श्रावण सरी आषाढातच बरसतात की काय अशी शंका निर्माण झाली. मात्र आषाढी एकादशी झाली, तसा पावसाचा जोर ओसरला, आभाळ येते पण पाऊस बरसत नाही, अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. पण खुशखबर अशी आहे, की श्रावण(Shravan 2025) सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तो आता परत येतोय...
दिनदर्शिकेवर जून ते ऑक्टोबर महिने पाहिल्यास काही तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनाचे नाव लिहिलेले आढळते. शनिवार १९ जुलै रोजी देखील दिनदर्शिकेवर अशी माहिती मिळते, की सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होत आहे आणि पुष्य नक्षत्राचे वाहन मोर असणार आहे. यावरून पावसाचा अंदाज कसा बांधला? हा विचार करत असाल तर नक्षत्रांचे मजेशीर गणित समजून घ्यायला हवे.
ज्योतिष शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्रं आहेत. त्यात पावसाची ९ नक्षत्रं आहेत. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, मघा, हस्त, उत्तराषाढा, चित्रा, स्वाती! यात पावसाळी नक्षत्र पाऊस प्रिय असलेल्या वाहनावरून स्वार होऊन आले तर भरपूर पाऊस पडतो. त्यानुसार पावसाचा अंदाज घेता येतो.
मृग नक्षत्र: मृग नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. कोल्हा पावसाचा अंदाज देत नाही, त्यामुळे या काळात चांगला किंवा वाईट पाऊस येऊ शकतो.
आर्द्रा नक्षत्र: आर्द्रा नक्षत्राचे वाहन मोर आहे. मोराला पाऊस आवडतो, त्यामुळे या काळात जोरदार पाऊस पडतो.
पुनर्वसू नक्षत्र: पुनर्वसू नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. बेडूक पावसाचे आगमन दर्शवतो, त्यामुळे या काळात चांगला पाऊस अपेक्षित असतो.
पुष्य नक्षत्र: पुष्य नक्षत्राचे वाहन गाढव आहे. गाढव जास्त पाऊस दर्शवत नाही.
मघा नक्षत्र: मघा नक्षत्राचे वाहन मोर आहे आणि ते जोरदार पाऊस दर्शवते.
हस्त नक्षत्र: हस्त नक्षत्राचे वाहन घोडा आहे. घोडा मध्यम पाऊस दर्शवतो.
नक्षत्र आणि वाहन बदलत असते. ८ जून रोजी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला होता आणि त्याचे वाहन कोल्हा होते. त्यामुळे पाऊस पडला पण पुरेसा नाही. मात्र आता १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्र मोरावर स्वार होऊन येत असल्याने जोरदार वृष्टी होण्याचे पंचांगाचे संकेत आहेत. त्यामुळे चातकाप्रमणे पावसाची वाट बघणाऱ्या पाऊस प्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी ठरेल हे निश्चित! चला तर स्वागत करूया श्रावण सरींचे...!
(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल)