Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:43 IST2025-11-22T15:43:44+5:302025-11-22T15:43:59+5:30
Astro Tips: कुंडलीत प्रत्येक ग्रहाचे स्थान त्याचा प्रभाव कसा पडणार हे निश्चित करते, जसे की गुरु संसार सुख देतो नाहीतर कमालीचे वैराग्य; कसे ओळखावे ते पाहू!

Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
शाळेत असताना आपण "माझी आई" ह्या विषयावर निबंध लिहायचो, आठवतंय का? अगदी मन आणि डोळे भरून यायचे, कारण आई हे प्रत्येक मुलाचे भावविश्व असते. ही आई आपली प्राथमिक गुरू, जी आपल्याला माणूस म्हणून घडवत असते. पुढे आयुष्यात आपल्याला अनेक गुरूतुल्य व्यक्तिमत्त्वे भेटत राहतात.
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
ग्रहमालिकेतील गुरू म्हणजे आशीर्वाद, अध्यात्म, देवावरील विश्वास आणि त्याच्या सेवेत राहण्याची बुद्धी; तसेच विचारशक्ती (सोच), वात्सल्य, प्रेम, माया, काळजी, संस्कार, कार्यप्रणाली, मान, अर्थप्राप्ती, शास्त्रांचा अभ्यास, ज्ञान आणि प्रत्येक गोष्टीतील लक्ष्मण रेषा.
गुरूतुल्य व्यक्तींचे बोलणे ऐकत राहावेसे वाटते. कुठे रमायचे, किती आणि कुणासमोर काय बोलायचे, हे त्यांना बरोबर समजते. आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक जणांचे आयुष्य घडवणारी ही लोकं असतात. कुंडलीतील गुरु देखील तेच कार्य करतो का? तर आपल्या पत्रिकेत प्रत्येक ग्रह वेगवेगळी फळे प्रदान करताना दिसतो.
प्रत्येक ग्रह शुभ-अशुभ फळेही देतो. आज गुरू बद्दल माहिती घेऊ. प्रत्येक पत्रिकेत गुरू फक्त चांगली आणि चांगलीच फळे देईल असेही नाही. हे फलादेश आपले पूर्वसुकृत असते, कारण त्यानुसारच आपला जन्म आहे. पत्रिकेत गुरू ज्या भावात असतो, त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टीतील उच्च फळे जातकाला मिळतात.
ग्रह आपल्या कर्मांचा आरसा दाखवतात, इतकेच. ते तुमचे ना शत्रू ना मित्र. येतंय का लक्षात?
गुरू हा ज्ञान देणारा, आयुंतिक (अत्यंत) शुभ, सात्त्विक ग्रह आहे. गुरूंच्या सान्निध्यात जगातील सर्वात असामान्य गोष्ट मिळते, जी पैसा खर्च करून मिळत नाही आणि ती म्हणजे "समाधान". आयुष्यात सुख, पैसा, भौतिक सुखे सर्व मिळेल, पण रात्री दोन गोळ्या घेतल्याशिवाय व्याधीग्रस्त शरीराला झोप येत नसेल, तर सर्व फोल आहे. संपत्ती, धन, ऐषो आराम सुखाची शांत झोप देऊ शकणार नाही, हेच अंतिम सत्य आहे. मनावर मणामणाचे ओझे घेऊन झोप येईलच कशी म्हणा. असो. सप्तम भावातील गुरू विवाहाला उशीर करेल आणि षष्ठेश म्हणून असलेला गुरू मोठे आजार देईल.
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
स्त्रीच्या पत्रिकेत गुरू हा एकंदरीत सुख प्रदान करणारा, म्हणजेच संसार सुखाचा करणारा, उत्तम पती सुख देणारा असतो. पण कर्क राशीत गुरू असेल, तर उल्लेख केलेली उच्चीची सुखे मिळतील, हा मात्र गैरसमज आहे. गुरू अध्ययन, सात्त्विक विचार, अध्यात्मिकता प्रदान करेल. नामस्मरणाची ओढ लावेल. उच्च कोटीची साधना, नामस्मरणाची ओढ देईल, पण संसार सुखात कमतरता येईल. सुखाची निद्रा देईल, पण सांसारिक सुख जे मुळात संसाराच्या रूपात अपेक्षित आहे, ते मिळणार नाही. संसारात मग्न असलेली स्त्री ही नामात गुंतू शकणार नाही. आणि म्हणूनच पत्रिकेत उच्च गुरू हा संसारापासून विरक्ती देताना दिसतो. वैवाहिक सुख, संतान सुख किंवा धन ह्यातील काहीतरी ठिकाणचा रिकामा कोपरा अनुभवायला मिळतो. कर्क राशीतील उच्च गुरू पत्रिकेतील कमजोरी ठरू शकतो, जेव्हा सांसारिक सुखाच्या प्राप्तीचा विचार आपण करतो.
गुरूंच्या दोन राशी आहेत - धनु आणि मीन. त्यांत धनु ही मूळ त्रिकोण राशी आहे. ह्या राशीपासून कर्क राशी आठवी येते; म्हणजेच कर्क राशीत असणारा उच्च गुरू हा मूळ त्रिकोण राशीच्या अष्टम भावात जाईल. चंद्र चांगला असेल, तर शुभ फळे मिळतील; पण चंद्रसुद्धा दूषित असेल, तर गुरूचीही फळे बिघडतील. ग्रह लग्नापासून अष्टम भावात किंवा मूळ त्रिकोण राशीपासून आठवा, चंद्रापासून आठवा असेल, तर त्याचा प्रभाव कमी होतो.
अशा स्त्रिया कुटुंबप्रमुखसुद्धा असतील, सर्व जबाबदाऱ्या उत्तम सांभाळतील, पण पती किंवा संतान सुखापासून वंचित राहतील. त्यांच्यात अंतर्ज्ञान, उत्तम वाचन क्षमता, अध्यात्मिक बैठक उत्तम, समोरच्याचे मन समजून घेण्याची क्षमता, अंतःस्फूर्ती असणे, समाजासाठी सतत काहीतरी करण्याची वृत्ती, मदतीला तत्परता, योग्य गोष्टींना योग्य महत्त्व देणाऱ्या आणि समाजकार्यात भाग घेणाऱ्या असतात. विधायक कार्यात मदत करतात. त्या अत्यंत संवेदनशील, भावूक, प्रेमळ असतात.
गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यातील कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. पत्रिकेतील उच्च गुरू बद्दल अनेकदा अनेक विद्वान खूप मोठी भविष्यवाणी करताना दिसतात. उत्तम नवरा मिळेल, हे होईल आणि ते होईल... पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. सांसारिक सुख, संतानप्राप्ती, धन ह्यात कुठेतरी न्यूनता असतेच, हा माझा असंख्य पत्रिका बघितल्यावरचा अनुभव आहे. आयुष्यात कमी काहीच नसते, पण पती किंवा मुले ह्यांत काहीतरी व्यथा (अडचणी) असतात. ज्योतिष हे अनुभव देणारे शास्त्र आहे. कुणीही काहीही हवेत सांगेल आणि तसे होईल असे नसते. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आणि शास्त्राचा आधार असतो. कर्क राशीत गुरू असलेल्या स्त्रियांच्या पत्रिका बघितल्या, तर ही सूत्रे नक्कीच अनुभवायला मिळतील.
तुमचेही अनुभव नक्की कळवा.
शुभं भवतु.
संपर्क : asmitadixit50@gmail.com