Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:47 IST2025-09-03T15:46:49+5:302025-09-03T15:47:33+5:30

Astro tips: समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, त्याला कारणीभूत असणार्‍या घटकांचा पूर्वविचार नवरा नवरीने आणि कुटुंबियांनी करायला हवा; त्याबाबतचा लेख.

Astro Tips: Take these precautions before marriage to prevent the Saptapadi of marriage from becoming a lifelong Taptapadi! | Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!

Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

जोडीदाराबद्दल अपेक्षा असल्याच पाहिजेत कारण आपल्याला त्यासोबत उर्वरित आयुष्य काढायचे आहे. रोज उठून भांड्याला भांडे लागून शेजार्‍यांना करमणूक होण्यापेक्षा आपल्या पसंतीचा, आपल्या आचार विचारांशी जुळते घेणारा आणि आयुष्याकडे पाहण्याचा आनंदी दृष्टीकोन असणारा जोडीदार कुणाला आवडणार नाही? पण ह्यासोबत आपल्या खंडीभर अपेक्षा असतात त्या जरा पुन्हा तपासून पहिल्या पाहिजेत.

Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही

दोन महिन्यापूर्वी एक पत्रिका मिलन करताना त्यांना मी सांगितले, दोन्ही पत्रिका ठीक आहेत पण आपल्या मुलीसाठी हे स्थळ फारसे योग्य वाटत नाही . ते दोघेही एकमेकांना भेटत होते वगैरे वगैरे सर्व ठीक. पण पत्रिकेनुसार त्यांच्या आयुष्याचे बारा वाजतील हे चित्र स्पष्ट दिसत होते. असो! मी आपले मत सांगितले पुढे त्यांची इच्छा! काही दिवसापूर्वी त्यांचा फोन आला आणि तेव्हा समजले की आता ते दोघे वेगळे झाले आहेत. मनात म्हटले चला एक होउ घातलेला घटस्फोट वाचला. दोघानाही योग्य जोडीदार मिळून त्यांचे भले होउदे हीच स्वामींकडे प्रार्थना!

थोडक्यात सांगायचे तर त्या मुलाच्याच पत्रिकेत विवाहास अडचणी आणणारी ग्रहस्थिती होती. त्यांना म्हंटले तुमचा मुलगा अत्यंत लहरी आणि विक्षिप्त स्वभावाचा आहे. सांगायला आवडेल की त्यांनी ते मोठ्या मनाने मान्य केले म्हणून मला त्यांचे कौतुक वाटले. अनेकदा आपण येणाऱ्या स्थळाकडून असंख्य अपेक्षा ठेवतो पण आपल्या अपत्याचा चेहराही एकदा आरशात बघावा असे सुचवावेसे वाटते. अनेकदा समोरच्या स्थळाला नाव ठेवण्यापेक्षा आपणसुद्धा त्यांच्या तोलामोलाचे आहोत का, ते पुनश्च तपासून पाहावे असेच मी सांगीन. शेवटी समोरच्याने आपल्याला होकार किंवा नकार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे.
 
आपल्या मुलामुलींचे स्वभाव आपल्याला त्यांच्या जन्मापासून माहित आहेत. एखादा चंचल असेल तर एखादी मुलगी आयुष्याला फार सिरीअसली घेत असेल. एखादा बेधडक वागणारा बोलणारा असेल तर एखादा आतल्या गाठीचा तर एखादा खूप समजूतदार असेल. आपल्याला आपली मुले व्यवस्थित माहित आहेत किंबहुना त्यांचे गुण आणि दुर्गुण ह्यांचा विचार करून स्थळ पाहिले पाहिजे. पोतंभर अपेक्षा समोरच्याकडून आणि आपले काय ? असे व्हायला नको. उदाहरण द्यायचे झाले तर मिथुन राशीतील मंगळ किंवा मिथुन नवमांशातील मंगळ हा स्वभाव जरासा हट्टी करतो. शास्त्र प्रचीती देतेच देते. कन्या लग्न राशी अत्यंत चिकित्सक असतात. वृषभ, तूळ किंवा नवमांशातील गुरु फारसे देवदेव करणारे नसतात. हे काही रॉकेट सायन्स नाही. बेसिक आहे हे. असो, त्यामुळे आपला मुलगा देवाला हात सुद्धा जोडत नाही पण येणाऱ्या सुनेने जी त्याच्याच पिढीतील आचार विचारांची तिने मात्र कुलाचार आणि देवदेव केले पाहिजे हा अट्टाहास असेल तर आधी मुलाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणायला बसवा. अपेक्षा दोन्हीकडून आहेत.
 
थोडक्यात आपल्या मुलाची सर्वार्थाने बाजू आपल्याला माहित असलीच पाहिजे आणि त्याच्यासमोर समोरच्याकडून किती अपेक्षा करायच्या ते ठरले पाहिजे. म्हणूनच गुण मिलनासोबत ग्रह मिलन महत्वाचे आहे. दशा, अंतर्दशा सर्व सतत बदलत असते. खूप वर्ष मित्र असणारे ते दोघे लग्नाच्या बंधनात अडकले की  आपण एकेकाळी खूप चांगले मित्र होतो हे विसरून का जातात? त्यांना लग्नाचे 'बंधन' का वाटायला लागते? आणि मग हळूहळू कोर्टाची पायरी चढायची वेळ का येते ? मग इतके वर्ष काय ओळखत होते एकमेकांना ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
    
आपल्या मुलांना कमी अजिबात लेखू नका पण त्यांच्यातील असलेले अवगुण नजरेआड सुद्धा करू नका. आहे ते असे आहे हे सर्वप्रथम आपण पालकांनी सुद्धा स्वीकारले पाहिजे. आपल्या तोलामोलाचे स्थळ शोधावे ते ह्याचसाठी! ह्यात आर्थिक स्थितीपेक्षाही विचारधारा महत्वाची आहे. पैशाची गणिते मांडून विवाह ठरवू नये. आज ज्या मुलाला एक लाख पगार आहे तो तितकाच राहणार नाही तो नक्कीच वाढत जाणार आहे . रंग रूप देखणेपणा , पैसा सगळेच बदलत जाणार आहे आणि ते बदल त्या त्या आयुष्याच्या वळणावर खुल्या दिलाने खरेपणाने स्वीकारता आले पाहिजे, ते धैर्य दोघांनीही दाखवले पाहिजे. जे व्हावे ते दोघांच्याही पसंतीने. संसार करायचा आहे जोडीदार विकत नाही घ्यायचा आपल्याला. दोन कुटुंबे पुढे अनेक वर्ष सणवार आनंदाने साजरे करताना दिसली पाहिजे . कुटुंबाचे गोकुळ झाले पाहिजे. संसार म्हणजेच तडजोड आणि ती दोन्ही कडून होणे आवश्यक आहे. 

अनेकदा पालक सांगतात मुलाला खूप स्थळे सांगून येत आहेत, मग प्रश्न असा आहे की अद्याप विवाह का जुळत नाही? कुणाला दुखवायचे नाही म्हणून हे प्रश्न मी स्वतः टाळते, पण आपणच आपल्या प्रश्नाचे उत्तर देत आहोत असे नाही का वाटत? इतकी स्थळे सांगून येऊनही विवाह होत नाही, म्हणजे कुठेतरी पाणी मुरते आहे. आपल्या मुलात असलेल्या कमतरता स्वीकारणे हेही फार धैर्याचे काम असते आणि त्यानुसार अपेक्षा ठेवणे हे अनेकांना जमत नाही. अनेकदा विवाहास अनुकूल दशा नसते, अशावेळी प्रत्येक स्थळात काहीतरी उणीव, कमतरता राहते आणि गोष्टी पुढे जात नाहीत कारण ग्रहस्थिती योग्य नसते. 

आम्ही मुलाकडचे म्हणजे काही वेगळे आहोत का? तर नाही! तसेच आमची मुलगी इतके लाख कमावते म्हणजे वेगळे आहोत का? तर अजिबात नाही. आज लाखात पगार असणाऱ्या मुलींची वये ३५ च्याही पुढे आहेत . मी तर असे म्हणीन की आपला मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या मुलातील गुण अवगुण सर्व अत्यंत खऱ्या मनाने स्वीकारून स्थळ पाहिले तर विवाह होण्याचे प्रमाण वाढेल असे वाटते. 

कुणीही ह्या जगात 'सर्वगुण संपन्न' नाही. असा मनुष्य देवाने जन्माला घातलेलाच नाही . आपला मुलगा किंवा मुलगीही अनेक गुण आणि अवगुणांचे मिश्रण आहे . अहो मुलेच कशाला ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्ती त्यात आपण स्वतः सुद्धा मोडतो सर्वगुण संपन्न अजिबात नाही.  त्यामुळे डोळसपणे जी आहे ती स्थिती स्वीकारता आली पाहिजे. आपला मुलगा अत्यंत उधळा आहे, वेळ प्रसंगी कठोर बोलतो, त्याच्या मनासारखेच झाले पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो हे गुण खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजेत आणि समोरच्यांना ते तितक्याच खरेपणाने सांगताही आले पाहिजेत . प्रेम विवाह असेल तरीही समोरासमोर बसून दोघांच्याही पालकांनी मोकळेपणाने चर्चा करावी पुढील संकटे टळतील. 

आज प्रत्येकाला एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. नुसता फोटो पत्रिका बघून काही होणार नाही एकमेकांना भेटणे विचार समजून घेणे हे अत्यावश्यक आहे. नुसता फोटो बघून जोडीदाराबद्दल मत ठरवणे हि धोक्याची घंटा आहे. भेटीत अनेक गोष्टी उलगडतात. वाटणे आणि असणे ह्यातील फरक समजतो, एकमेकांशी मोकळेपणाने बोलणारी आजकालची पिढी आहे. संवाद हा दोघांना जवळ आणेल. असे झाले नाही तर आयुष्यभर विवाह संस्थेत नाव नोंदवणे आणि त्यांच्या फी भरत राहणे, स्थळे बघणे ह्या दुष्ट चक्रात अडकून राहायला होईल. एकमेकांना निदान एकदा तरी भेटा, मग हवे तर नकार होकार काय ते ठरवा. पण हिला एकदा तरी भेटायला हवे होते ...असे विचार वेळ निघून गेल्यावर मनात आले तरी उपयोग होणार नाही. 

आज पगाराच्या भिंती विवाहातील मोठी अडचण आहे. पगार अपेक्षेप्रमाणे नाही त्यामुळे पुढे भेटी वगैरे एकदम बाद होते . कुठेतरी हे सर्व थांबले पाहिजे . कधी म्हणजे ? आत्ता ह्याक्षणी ......ह्यात मुलांचे पालक, आप्तेष्ट, हितचिंतक सर्वांनी मुलांची मने वळवा, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. शेवटचा निर्णय घेण्यास ते चुकत तर नाहीत ना हे डोळ्यात तेल घालून बघा.

मध्यंतरी एका गावातून एका शेतकऱ्याने मला फोन केला होता, म्हणाले आज गावातील मुलांची लग्ने रखडली आहेत. गावात यायला कुणी मुली तयार नाहीत आणि गावातील मुलीना शहरात जायचे वेध लागले आहेत ...करावे तरी काय ? आज विचारांचे परिवर्तन होणे सर्वार्थाने आवश्यक आहे. फक्त मुलांचीच नाही तर मुलींचीही वये चाळीशीकडे झुकत आहेत ....हे सर्व प्रश्न आपले सर्वांचे आहेत तुमच्या आमच्या घरातील आहेत ....सहमत ?

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: Take these precautions before marriage to prevent the Saptapadi of marriage from becoming a lifelong Taptapadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.