Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:15 IST2025-09-05T15:14:40+5:302025-09-05T15:15:45+5:30

Astro tips: झटपट श्रीमंत करणारा मार्ग म्हणजे शेअर मार्केट पण ते सगळ्यांनाच फळते असे नाही, ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून कोणाला लाभ कोणाला तोटा ते पाहू. 

Astro Tips: If your planetary position is 'this', you will benefit from the stock market, otherwise, it's a no-brainer! | Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!

Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

सगळ्यांना वेड लावणारे शेअर मार्केट अभ्यासपूर्वक हाताळले तर फायदेशीर नक्कीच आहे पण इथे क्षणात रावाचा रंक सुद्धा होऊ शकतो. झटपट श्रीमंत होण्याचा हा पर्याय असे वाटणाऱ्या लोकांना ह्याची दुसरी बाजू माहित नाही. कुठल्याही गोष्टीचा अंमल चढला की त्याची धुंदी उतरायला वेळ लागतो. हे आभासी जग आहे जे राहूचे आहे. Gpay , net , RTGS वगरे म्हणजे राहू . झटपट पैसा मिळवण्याच्या नादात आपल्या कुटुंबाची वाताहत तर होणार नाही ना ह्याची काळजी सर्वप्रथम केली पाहिजे. आपली गुंतवणूक ही कमी नफा मिळवून देणारी असली तरी चालेल पण हृदयाचा ठोका थांबवणारी नसावी.
 
ह्या जुगारात अनेकदा अंदाज चुकले आणि लाखोंचा तोटा झाला तर तो पेलवायाची ताकद आपल्यात आहे का? मग मानसिक संतुलन बिघडते आणि त्यावर उपाय म्हणून मग सर्व व्यसने समोर हात जोडून उभीच राहतात. एकदा यश मिळाले की हात जणू आभाळाला लागतात. मग जीवघेणी खेळी सुरु होते. अधिक हाव, अधिक लालसा, अधिक नफा मिळवण्याची नशा चढते. मग आहे ते सर्व पणाला लागते आणि पुढे ...सुज्ञास सांगणे न लगे. आयुष्याच्या सारीपटावर पुन्हा एकदा भला मोठा अंधार, आपली पत गमावणारा, मिळवलेली अब्रू वेशीवर टांगणारा आणि घराण्याचे नाव पात पणाला लावणारा. हा अंधार खरच जीवघेणा की  कित्येक आयुष्य सुद्धा ह्या अंधारात कायमची लुप्त होतात .

इतकी मोठी जोखीम घेणारा मध्यमवर्ग अनेक संकटाना तोंड देताना दिसतो . घरातील स्त्रीवर्गाचे दागिने सुद्धा गहाण ठेवून झटपट श्रीमंत दाम दुपटीने पैसा मिळवावा हे स्वप्न दाखवणारा हा जुगार मती गुंग करणारा आहे. रोज मिनिटा मिनिटाचे ट्रेडिंग करणे, डोळ्याच्या खाचा आणि मेंदूला मुंग्या येईपर्यंत आपले रोजचे काम सोडून ह्यात गुंतणे हे अत्यंत धोक्याचे आहे. फायदा हवा तर जोखीम घ्यायचीही तोटा सहन करण्याचीही मानसिकता हवी. सगळे कानाला कायम गोड गोड कसे ऐकायला मिळणार?

हा जुगार जीवघेणा आहे. कुटुंब आणि कुटुंबाचे सुख स्वतःच्या हाताने नष्ट करताना दहा वेळा विचार करा . लक्ष्मी इतकी सहज नाही . अपार मेहनत करून ती कमवावी लागते . एखाद्या गोष्टीचा अपुरा अभ्यास पण डोंगर इतका ध्यास जीवनाला वेगळी कलाटणी देवू शकतो . ज्याला हा जुगार संयमाने खेळता आला तो ह्यात तरेल पण इतरांचे काय ?झटपट मिळवायचे कि झटपट  घालवून बसायचे ?

एखाद्या ट्रेड मध्ये फायदा झाला की मग हाव सुटते आणि मग अजून हवे अजून हवे, ही जीवघेणी न संपणारी इर्षा अधिकच फुलत जाते. सुगीचे दिवस क्षणात संपतात आणि आपण भानावर येतो तेव्हा ओंजळीतून सर्व निघून गेलेले असते असे मात्र व्हायला नको. ह्या सर्वाचा परिणाम मन, शरीर, झोप, विचार ह्या सर्वावर होत असतो आणि कालांतराने तो हाताबाहेर जाऊन मोठ्या आजारांचे मूळ ठरतो. शेअर मार्केट अजिबात वाईट नाही . पण त्याची मोहिनी पडून त्यात आयुष्याची वाताहत झाली तर अर्थ नाही त्याला. अभ्यासपूर्वक आपले अंदाज बांधून त्यात पैसे लावणे हे नेहमीच समर्पक राहील. सुरवात केली, पण कुठे थांबायचे? कुठे मनाला आवर घालाचा  ते समजले पाहिजे. 

ज्योतिषीय विश्लेषण पाहताना ज्यांचे पंचम अबाधित आहे किंवा जिथे बुध राहू दुषित नाहीत , धन पंचम लाभ हे भाव देत आहेत ह्या दशेत ह्यातून पैसा मिळू शकतो . पण ज्यांचे अष्टम , व्यय भाव कार्यान्वित आहे त्यांना काही न काही नुकसान होणार हे ठरलेलेच आहे .

घेतलेले शिक्षण आणि मिळकत त्याची मोट रोजच्या जीवनातील प्रश्नांशी बांधताना मग शेअर मार्केट सारखा झटपट श्रीमत होण्याचा मार्ग सोपा वाटतो आणि आपल्याही नकळत आपण त्यावर चालू लागतो . आज स्वतःचे घर नाही म्हणून अनेकांचे विवाह होत नाहीत हे चित्र आहे मग पैसा मिळवायचा तरी कसा. त्यासाठी अनेक इतर पर्याय आहेत पण ते झटपट पैसा देणारे नाहीत म्हणून ते खुणावत नाहीत किबहुना ते पर्याय म्हणून स्वीकारले जात नाहीत . 

पैसा दुसर्याकडून उधार घेऊनसुद्धा अनेकजण ह्या शर्यतीत भाग घेतात आणि मग तो डूबला की तो परत कसा द्यायचा हा यक्षप्रश्न समोर उभा राहतो . त्यात मग स्वतःच्या ठेवी विकणे, त्यावर कर्ज घेणे हे प्रकार सुरु होतात, घरची शांतता भंग होते आणि मग दोन घास सुखाचे खात होतो तेच बरे असे म्हणायची वेळ येते . 
हव्यास मग तो कशाचाही असो, वाईटच असतो पण तो जीवघेणा नसावा. आपण जसे आहोत तसे आहोत. नशिबात असेल तो पैसा मिळणार आणि जायचा तो जाणार. कुणाला विचारायचे नाही , सल्ला घ्यायचा नाही स्वतःला शहाणे  समजायचे, अशा अनेक व्यक्तींच्या पत्रिका पाहून हा लेख लिहायची इच्छा झाली . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की शेअर मार्केट हा पर्याय प्रत्येकाने स्वीकारावा पण अभ्यासपूर्वक! त्याच्या अधीन जावू नये , त्याला सर्वस्व मानु नये इतकेच! कारण जेव्हा मार्केट पडते आणि तोटा सहन करायला लागतो तो करायचीही हिम्मत नसेल स्वतःला नक्कीच जाब विचारा. 

नैराश्येच्या गर्तेत नेणारा हा बाजार आहे ह्याचे भान योग्य वेळेस झाले तर बरे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी नाही का गुंतवणूक केली, पण सुरक्षित सावध, अनेक पर्याय आजही आहेत जे दोन टक्के कमी देणारे पण सुरक्षित आहेत. पोस्टात लोक आजही गुंतवणूक करतात जी सुरक्षित आहे त्याची लाज वाटायला नको. 

माणूस पोटासाठी कष्ट करतो आणि धन कमावतो . पण त्यासाठी झटपट श्रीमत होण्याचा अट्टाहास नको . सगळे आयुष्य पणाला लावून मिळणार काय ? मोठे आजार , व्यसन , कौटुंबिक मतभेद की नात्यातील तिढा ? नक्की काय हवे आहे आपल्याला?

ऑप्शन ट्रेडिंग , इंट्रा डे ट्रेडिंग हे आकर्षण निर्माण करते पण ते क्षणिक असते . फ्युचर ऑप्शन , कॅडल स्टिक , निफ्टी , सेन्सेक्स , असेट अलोकेशन असे शब्द कानावर आदळू लागतात आणि माणूस ह्या चक्रात ओढला जातो. राहू सावधपणे आपली खेळी खेळत असतो पण ती समजायला आपल्याला उशीर होतो. समजते तेव्हा सर्व संपलेले असते. गुंतवणुकीचे इतर अनेक मार्ग आहेत पण अपुरा अभ्यास ह्यामुळे आपल्याच आयुष्याचे चित्र बदलते. 

आयुष्यभर ताठ मानेने, अभिमानाने जगलो, आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कुणाहीवर अवलंबून नको राहायला म्हणून थोडे थांबून विचारपूर्वक ,अभ्यास करून योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करा . आपले आयुष्य दिशाहीन होण्यापासून आपणच वाचवायचे आहे, तसेच आयुष्यात शॉर्ट कट नसतात हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच. विघ्नहर्ता सर्वाना चांगली बुद्धी देऊ दे.

श्री स्वामी समर्थ 

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: If your planetary position is 'this', you will benefit from the stock market, otherwise, it's a no-brainer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.