Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:05 IST2025-07-15T17:05:21+5:302025-07-15T17:05:47+5:30
Delayed Marriage Astro Tips: समाजात अनेक अशी मुलं मुली आपण पाहतो, ज्यांच्याकडे रूप, गुण, पैसा, नोकरी सगळं असूनही मनासारखा जोडीदार मिळत नाही; का? ते जाणून घ्या!

Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह आयुष्यातील आनंदाचा सोहळा. पण हा सोहळा उपभोगण्याचे भाग्य सगळ्यांना मिळत नाही हे दुर्दैव आहे. पण जे आहे ते आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील कुठलातरी एक कोपरा रिता असतो. शैक्षणिक प्रगती, नोकरी, परदेशगमन, व्यवसाय, अर्थार्जन, विवाह, वैवाहिक सुख, संतती, मानसिक स्थैर्य, शरीर संपदा ह्यातील काहीतरी एक गोष्ट मनासारखी नसते किंवा ती मिळतच नाही.
शिक्षण, नोकरी ह्या प्रवासानंतर जेव्हा मुलगा कमावता होतो, तेव्हा आई वडिलांचे सगळे लक्ष मुलाचे दोनाचे चार म्हणजेच विवाह कधी होईल ह्याकडे लागते. सुनबाई, जावई येण्याचे वेध लागतात आणि मग सगळीकडे नाव नोंदणी सुरु होते. नातेवाईक, जवळचे आप्त ह्यानाही चार ठिकाणी 'यंदा मुलाला कर्तव्य आहे' अशा प्रकारे सूचित केले जाते. तरुणाईसुद्धा आयुष्यातील नवीन वळणाची चाहूल लागल्याने खुश असते. मनात स्वप्नरंजन होत असते. थोडक्यात सगळे कुटुंब एक वेगळाच आनंद अनुभवत असते. पण अनेकदा ह्या आनंदाची सुरवात होण्याआधीच त्याला ग्रहण लागते, जेव्हा अनेक स्थळे पाहूनही कुठेतरी काहीतरी अडते, नाडी दोष, सगोत्र, गुणमिलन आणि पुढील ग्रहमिलन ह्यातील उणीवा, आजकालची मोठी समस्या म्हणजे “पगार किती''? मुलाचा पगार आणि आर्थिक सुबत्ता ही पहिली अट, ह्याचा अर्थ मुलगा इतर बाबीत कसाही असेल तरी चालणार आहे का? असो! अशा अनेक अडचणी!
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
तात्पर्य असे की विवाहोत्सुक मुले मुली अनेक प्रयत्न करूनही जेव्हा विवाह जुळत नाही, तेव्हा हताश, निराश होतात. अशावेळी मग पत्रिका तपासून घेण्यासाठी किंवा असे का होत आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे मोर्चा वळतो!
विवाह ही आयुष्यातील सुखद घटना आहे. अनेकदा हे सुख परमेश्वराने अनेकांच्या ओंजळीत घातलेले नाही, भले त्यांना पैसा आणि इतर भौतिक सुखात कमतरता नसेल, पण विवाहापासून अनेकांना वंचित ठेवले आहे. हे असे का? तर त्याला उत्तर नाही. हे आपले भोग आहेत आणि ते जितके लवकर स्वीकारू तितके आयुष्य पुढे जाईल. पण ते स्वीकारणे खरंच कठीण असते. एखाद्या मुलाच्या नशिबात विवाह नाही, हे त्याच्या पालकांना सांगणे, हे सांगणाऱ्या व्यक्तीला किती दडपण आणणारे आहे, ह्याची कल्पना येणार नाही.
आज पत्रिकेतील अशा ग्रहस्थिती बघूया, जिथे विवाहाचे सुख नाही. कदाचित ह्या विषयावरील विश्लेषण अभ्यासकांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. विवाह म्हटला की शुक्र आलाच. आपण विवाह आपल्या मनाच्या पसंतीने करतो म्हणजे चंद्र आला. विवाहासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लागतो, म्हणजे गुरु हवाच, सप्तम भाव शुद्ध हवा, शेवटी विवाह होणार की नाही हे ठरवणारा दशा स्वामी हवा. त्याच्याशिवाय घटना घडणे अशक्य.
पहिली ग्रहस्थिती – मेष लग्नाला चंद्राची दशा आणि चंद्र वृश्चिकेत बुधाच्या जेष्ठा नक्षत्रात. बुध स्वतः भाग्यात असून केतूच्या मुळ नक्षत्रात केतू चतुर्थ भावात. इथे चंद्र बुधाच्या नक्षत्रात असल्यामुळे मुख्यत्वे बुधाची फळे देणार बुध ३, ६, ९, ४ ही स्थाने देत आहे, जी विवाहाची नाही. त्यात भरीस भर म्हणून वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र दशम भावात श्रवण नक्षत्रात, जे वैवाहिक सुखात न्यूनता दर्शवते. दशम भावात शनी राहू अंशात्मक युतीत, शनी लाभेश लाभेश्याच्या व्ययात. पितृदोष , शुक्र दुषित, चंद्र अष्टम भावात, दशा स्वामी विवाहाच्या विरोधी भावाची फळे अशा ग्रहस्थितीत चंद्राची दशा सोडून द्यायला लागेल, तोवर वय होईल ४५ च्या आसपास. ह्या आधीची रवी आणि नंतर येणारी मंगळाची दशासुद्धा विवाहासाठी पूरक नाही.
दुसरी ग्रहस्थिती – शुक्र पत्रिकेत लग्नी मुलगा देखणा हुरहुन्नरी, पण मंगळ केतू युती भाग्यात मंगळ सप्तमेश, त्यामुळे मंगळ शत्रुराशीत केतू सारख्या विरक्त ग्रहासोबत! राहूची दशा आणि राहू स्वतः तृतीय भावात गुरूची फळे देणार त्यामुळे राहुने ३, ६ आणि केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे ९ स्थान पण दिले. ही सर्व स्थाने वैवाहिक सुख देणार नाहीत. भौतिक सुखात कमतरता नाही, पण ती उपभोगण्यासाठी सहचारिणीचे सुख मात्र वंचित ठेवले.
अनेकदा अतिगंड योग, प्रामुख्याने विष्टीकरण ह्यांच्या शांती करून घ्याव्यात असे माझे मत आहे. जर ते योग पत्रिकेत असतील तर! पत्रिकेत शनी ( वक्री )चतुर्थ भावात ज्याची लग्नातील शुक्रावर दृष्टी. शनीची दृष्टी म्हणजे विलंब आलाच. राहूची दशा सोडून द्यावी लागणार, कारण राहू विवाह देत नाही. त्याधीची मंगळाची दशा त्यात विवाह झाला नाही, कारण मंगळ राहुच्याच नक्षत्रात पुन्हा तेच चक्र फिरणार.
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
तिसरी ग्रहस्थिती – गुरूची दशा गुरु व्यय भावात आणि चंद्राच्या नक्षत्रात चंद्र स्वतः चतुर्थात वृषभ राशीत असला तरी फळे देताना तो तृतीय भावाची देत आहे, म्हणजे दशा स्वामी ३ आणि ६ स्थानांचा कार्येश झाला. कुंभ लग्नाला गुरु तशीही विशेष फळे देत नाही. ह्या पत्रिकेत विशेष म्हणजे शनी लग्नेश असून दशम भावात पण स्तंभी आणि त्याची दृष्टी सप्तम भावावर जो विवाहाचा मुख्य भाव आहे.
अशा अनेक ग्रहस्थिती बघितल्या की इतर सुखांची रेलचेल दिसते पण वैवाहिक सौख्याला दृष्ट लागलेली असते. अलीकडेच नोकरी उत्तम , सगळंच उत्तम असलेला मुलगा फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजावरून आणि विचारात असलेल्या प्रश्नांवरून त्याला लग्न करायची किती तळमळ होती ते जाणवले. पण पुन्हा तेच विवाहाचा योगच नाही!
अशावेळी काय बोलावे सुचत नाही. पण उमीद पे दुनिया कायम है... खरंच अशावेळी डोळ्यात पाणी येते. अहो ज्योतिषी हा सुद्धा तुमच्यातलाच एक आहे, त्यालाही संसार, मुले सुख दुख आहे. आपण सगळेच संसारी लोक असून लहान लहान इच्छा पूर्ण झाल्या तरी खुश होतो, फार मोठे काही मागायचे नसते आपल्याला, फक्त आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या मुलांचा संसार नांदताना डोळे भरून पहावासा वाटतो. ही इतकीही इच्छा पूर्ण नाही करणार महाराज? असे मनात येत राहते.
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
त्याची पत्रिका मिटली आणि देवाजवळ प्रार्थना केली, आयुष्याची सुरुवात आहे ह्या मुलांची, असा राग धरू नकोस रे बाबा त्यांच्यावर...देऊन टाक त्यांना काय हवे ते आणि पडूदेत अक्षता सर्व विवाह करणाऱ्या सर्व मुला मुलींच्या डोक्यावर...पालक डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पहात आहेत बाबा. महाराजांनी लेकीची ही मागणी ऐकावी इतकीच विनम्र विनंती आहे त्यांच्या चरणी.
संपर्क : 8104639230