ट्युबच्या सहाय्याने पोहणे बेतले जीवावर; अंबाजोगाईतील काळवटी तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 21:40 IST2019-03-21T21:35:40+5:302019-03-21T21:40:53+5:30

पोहता येत नसल्याने तो पाण्यावर ट्यूब ठेऊन त्यावर बसला होता.

Youth's death in Kalwati Lake in Ambajogai | ट्युबच्या सहाय्याने पोहणे बेतले जीवावर; अंबाजोगाईतील काळवटी तलावात बुडून युवकाचा मृत्यू

ट्युबच्या सहाय्याने पोहणे बेतले जीवावर; अंबाजोगाईतील काळवटी तलावात बुडून युवकाचा मृत्यू

अंबाजोगाई (बीड ) : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा अंबाजोगाई शहरालगतच्या काळवटी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली.

साहिल अख्तर शेख (वय १८, रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई) असे त्या युवकाचे नाव आहे. आयटीआयचा विद्यार्थी असणारा साहिल गुरुवारी दुपारी ३.३० वाजता तीन मित्रांसोबत काळवटी तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहता येत नसल्याने तो पाण्यावर ट्यूब ठेऊन त्यावर बसला होता. अचानक ट्यूब पलटी झाल्याने तो पाण्यात पडला असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. पाण्यात पडल्यानंतर पोहता येत नसल्याने तो बुडाला. हे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले.

या घटनेची माहिती मिळताच साहिलच्या नातेवाईकांनी, मित्र परिवाराने आणि नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली आणि साहिलचा शोध सुरु केला. साडेचार तासांच्या परिश्रमानंतर अखेर साहिलचा मृतदेह हाती लागला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. उमद्या युवकाच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Youth's death in Kalwati Lake in Ambajogai