'आकस्मिक मर' आणि 'अळीचा प्रादुर्भाव'; बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:07 IST2025-09-23T17:05:22+5:302025-09-23T17:07:07+5:30
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचा चिखल, बाधित पिकांचे व्यवस्थापन होणार का?

'आकस्मिक मर' आणि 'अळीचा प्रादुर्भाव'; बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट
बीड : जिल्ह्यात ७ लाख ८९ हजार ६७६ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे, ही पेरणी सरासरी क्षेत्राच्या ९७.६ टक्के आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, ते बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असला, तरी अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, अतिरिक्त पाऊस झाल्याने पिकांचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात बाजरीची ५०.५ टक्के, तर मक्याची ९४.२ टक्के पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके सध्या पक्वतेच्या किंवा काढणीच्या अवस्थेत आहेत. अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. मका पिकावर काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. तुरीची पेरणी ८६.६ टक्के झाली असून, पीक सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. अतिवृष्टी झालेल्या भागात 'मर' रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना 'बायोमिक्स'ची आळवणी करण्याची शिफारस कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
मूग आणि उडदाची परिस्थिती
मुगाची ७६.५ टक्के, तर उडदाची १४८.७ टक्के पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मुगाची ९०-९५ टक्के, तर उडदाची ५०-६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. सध्या मुगाची सरासरी उत्पादकता ९५१.९४ किलो/हेक्टर तर उडदाची ९२८.७८ किलो/हेक्टर आहे. पावसामुळे काढणीला उशीर होत असून, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
'आकस्मिक मर' रोगाचा प्रादुर्भाव
सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १२८ टक्के झाली आहे. पीक सध्या शेंगा पक्व होण्याच्या किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. वडवणी आणि गेवराई तालुक्यात शेंगा आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'क्वीनलफोस' किंवा 'प्रोफेनोस' ची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कापसाची पेरणी ७७.९ टक्के झाली असून, पीक बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी 'आकस्मिक मर' रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, युरिया, पांढरा पोटॅश आणि कॉपर ऑक्सिक्लोराइडच्या मिश्रणाची आळवणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.