संपत्तीसाठी पत्नीने निर्व्यसनी पतीला व्यसनमुक्ती केंद्रात डांबले; बीडमधील ग्रामसेवकाची आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:58 IST2026-01-20T13:55:28+5:302026-01-20T13:58:10+5:30
अर्धांगिनीनेच रचला पतीला अडकवण्याचा कट; एका ग्रामसेवकाची सुन्न करणारी कहाणी.

संपत्तीसाठी पत्नीने निर्व्यसनी पतीला व्यसनमुक्ती केंद्रात डांबले; बीडमधील ग्रामसेवकाची आपबिती
बीड : व्यसन नसतानाही पत्नीने संगनमत करून पतीला बळजबरीने व्यसनमुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मानवी हक्क आयोगाकडे पीडित ग्रामसेवकाने न्याय मागितला असून, व्यसनमुक्ती केंद्र आणि पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
गणेश (नाव बदलले) या ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ते घरी असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवाजी नगर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने बळजबरीने उचलले आणि कारमध्ये टाकले. प्रत्यक्षात त्यांना पोलिस स्टेशनला न नेता एका व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले. विशेष म्हणजे, गणेश यांना कोणतेही व्यसन नसताना केवळ मालमत्ता आणि आर्थिक वादातून पत्नीने केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मालमत्तेसाठी घातल्या अटी!
गणेश यांना केंद्रात डांबल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता, पत्नीने सुरुवातीला ते बाहेरगावी ट्रेनिंगला गेल्याचे सांगून दिशाभूल केली. मात्र, सत्य समोर आल्यावर "पगार खाते संयुक्त करा आणि घर नावावर करा, तरच व्यसनमुक्ती केंद्रातून सोडते," अशी अट पत्नीने घातली. अखेर गणेश यांच्या भावांनी 'जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा'कडे तक्रार केल्यानंतर, प्राधिकरणाच्या हस्तक्षेपामुळे ८ जानेवारी रोजी त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी १५ जानेवारी रोजी लेखी तक्रार केली आहे.
आर्थिक लूट आणि छळाचा आरोप
सुटका करण्यापूर्वी केंद्राने गणेश यांच्याकडून बळजबरीने १६,४०० रुपये फी म्हणून वसूल केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आपला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ झाला असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कठोर कारवाई करावी
पीडित व्यक्तीचे नातेवाईकांनी विधी सेवा प्राधिकरणकडे तक्रार केली आहे. तसेच याबाबत विचारणा केली आहे. या प्रकरणात सविस्तर अहवालही मागवला आहे. चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हायला हवी.
- तत्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड
तक्रारीत तथ्य नाही
पीडित व्यक्तीच्या पत्नीने शपथपत्र दिले आहे. तसेच त्यांचे काही पुरावेही आहेत. न्यायालयाकडूनही विचारणा झाली होती, त्याप्रमाणे त्यांना उत्तरही दिले आहे. तक्रारीत तथ्य नाही.
- तेजस घुमरे, संचालक, व्यसनमुक्ती केंद्र बीड