जाचामुळे जीवन संपवलेल्या शुभांगीच्या मृतदेहाला सासरच्यांनी लसूण का चोळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:00 IST2025-06-07T11:44:02+5:302025-06-07T12:00:25+5:30

'पाच लाख दिले तरी त्रास थांबला नाही'; माहेरचे येण्याआधीच मृतदेह खाली उतरवला; शुभांगीच्या आत्महत्येमागे घातपाताचा कुटुंबाचा संशय

Why did the in-laws rub garlic on the body of Shubhangi, who had died due to a stroke? | जाचामुळे जीवन संपवलेल्या शुभांगीच्या मृतदेहाला सासरच्यांनी लसूण का चोळला?

जाचामुळे जीवन संपवलेल्या शुभांगीच्या मृतदेहाला सासरच्यांनी लसूण का चोळला?

- संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड) :
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर अजून एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगी रूस्तुम सोळंके (वय २५, रा. गीता, अंबाजोगाई) या विवाहितेने गुरुवारी (दि. ६ जून) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत तिच्या माहेरच्यांनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे.

शुभांगीचा विवाह २०२२ मध्ये अंबाजोगाईतील संतोष विलास शिंदे याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतरपासूनच शुभांगीवर सासरच्या मंडळींकडून पैशांची सतत मागणी होत असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. तिने पाच लाख रुपये दिल्यानंतरही छळ थांबला नाही, उलट तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार वाढले.

गुरुवारी सकाळी शुभांगीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने तिच्या भावाला फोन करून घटना कळवली. मात्र, शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळंके यांनी स्पष्ट सूचना दिली होती की “आम्ही येईपर्यंत मृतदेहाला हात लावू नका.” तरीही शिंदे कुटुंबीयांनी तिचा मृतदेह खाली उतरवत, मृतदेहाला लसूण चोळल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहेरच्यांना मृतदेहावर आणि बाजूला ठेचलेला लसूण आढळून आला आहे. या प्रकारामागचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात सासू सुमन शिंदे, सासरे विलास शिंदे, नणंद सीमा शिंदे, पती संतोष शिंदे आणि व्यवसायिक भागीदार संदीप काचगुंडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून, संदीप काचगुंडे अद्याप फरार आहे.

मुलीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घ्यायचं आहे
विशेष म्हणजे, संदीप काचगुंडे हा भाजपचा पदाधिकारी असून, त्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याचा दावा शुभांगीच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. काचगुंडेला तातडीने अटक करावी, तसेच मृतदेहाची अवहेलना का केली गेली, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोळंके कुटुंबीयांनी केली आहे. “आम्हाला आमच्या मुलीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घ्यायचं आहे. आम्हाला न्याय हवा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी मृत शुभांगीच्या नातेवाइकांनी माध्यमांमार्फत केली.

बाळाचा ताबा चुलत चुलत्याकडे
मयत शुभांगी शिंदे हिला दीड वर्षाचा मुलगा आहे. शुभांगीच्या आत्महत्या प्रकरणी सासू-सासरे, पती आणि नणंद अटकेत आहेत. तर दीड वर्षाच्या मुलाचा सांभाळ शुभांगीचा चुलत दीर करत असल्याची माहिती सोळंके कुटुंबांनी दिली.

Web Title: Why did the in-laws rub garlic on the body of Shubhangi, who had died due to a stroke?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.