सीईटी होवो अथवा नाही, बीड जिल्ह्यात अकरावीच्या ४ हजार जागा राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:08+5:302021-07-25T04:28:08+5:30

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ...

Whether there is CET or not, 4000 seats will be vacant in Beed district | सीईटी होवो अथवा नाही, बीड जिल्ह्यात अकरावीच्या ४ हजार जागा राहणार रिक्त

सीईटी होवो अथवा नाही, बीड जिल्ह्यात अकरावीच्या ४ हजार जागा राहणार रिक्त

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी राज्य मंडळ व अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण, प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा २० जुलैपासून उपलब्ध केली. मात्र त्यानंतर तांत्रिक कारणामुळे हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे. ते सुरू होईल तेव्हा होईल; मात्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी सुरू केली आहे.

दहावी पास विद्यार्थी - ४०,५२२

अकरावीसाठी एकूण जागा - ४४,६४०

कला शाखा - २२,५६०

वाणिज्य शाखा - १,७६०

विज्ञान शाखा - १७,७६०

संयुक्त (कला, वाणिज्य) २,५६०

सीईटी वेबसाईट हँग

इयत्ता ११ वी प्रवेशपूर्वपरीक्षेसाठी २६ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे ११ वीत प्रवेशासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र दहावीच्या निकालाप्रमाणेच येथेही अनुभव आला. संकेतस्थळ सुरू होत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळ बंद केले असून, ते सुरू केल्यानंतर अर्ज भरण्यास पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

सीईटीची तयारी कशी कराल?

इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्नांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न असतील, परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची दुय्यम प्रत मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Whether there is CET or not, 4000 seats will be vacant in Beed district