'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' शेतकऱ्याचा 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:29 IST2025-09-29T16:24:14+5:302025-09-29T16:29:11+5:30
कर्जमाफी आणि वाढीव मदत कधी? शेतकऱ्याचा फडणवीस, पवार, शिंदेच्या बॅनरसमोर 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल

'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' शेतकऱ्याचा 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल
- नितीन कांबळे
कडा (बीड): अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत आणि केवळ फोटोसेशन करून गेलेल्या नेत्यांविरोधात बीड जिल्ह्यातील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने अनोखे आंदोलन छेडले आहे. 'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' असा संतप्त सवाल उपस्थित करत या शेतकऱ्याने थेट शेतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावून त्यांच्यासमोर चक्क डोक्यावर उभे राहून (शीर्षासन) आपल्या व्यथा मांडल्या.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील अर्जुन शहादेव घोडके या शेतकऱ्याचे जोरदार पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्या शेताचा अक्षरशः 'मसनवाटा' झाला आहे. सरकारने शेतात येऊन पंचनामे केले आणि तुटपुंजी मदत जाहीर केली. मात्र, या लाखोंच्या नुकसानीसमोर ही मदत केवळ शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखी आहे, असा रोष व्यक्त होत आहे.
बॅनरसमोर शीर्षासन आणि लोंटागण
शेतकरी अर्जुन घोडके यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी शेतात शासनाच्या तीनही प्रमुख नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावले. या बॅनरसमोर त्यांनी पिकात लोंटागण घेतले आणि त्यानंतर डोक्यावर उभे राहून आपल्या व्यथा जगासमोर मांडल्या.
तातडीने कर्जमाफी करावी
घोडके यांनी यावेळी, "लाखोचे नुकसान झाले असताना शासन टीचभर मदत करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा मोडलेला कणा पुन्हा ताठ करण्यासाठी वाढीव मदत तात्काळ जाहीर करावी आणि तातडीने कर्जमाफी करावी," अशी कळकळीची मागणी केली आहे. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती यातून पुन्हा एकदा समोर आली आहे.