बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच

By सोमनाथ खताळ | Updated: February 12, 2025 20:01 IST2025-02-12T20:01:23+5:302025-02-12T20:01:38+5:30

जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता बीडला बिहार संबोधण्यात आले. बीडमधील भयान वास्तव अनेकांनी मांडले. यामुळे बीडची चर्चा राज्यभर झाली.

When will crime in Beed stop? The Superintendent of Police has been changed but serious crimes continue to occur | बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच

बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करून नवनीत कॉंवत यांची नियुक्ती केली. काँवत हे डॅशिंग अधिकारी असून, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, त्यांनी पदभार घेल्यानंतरही जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबत नसल्याचे समोर आले आहे. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे आजही जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता बीडला बिहार संबोधण्यात आले. बीडमधील भयान वास्तव अनेकांनी मांडले. यामुळे बीडची चर्चा राज्यभर झाली. त्यातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या भरदिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक जुने प्रकरणेही आता समोर येऊ लागले आहेत. तसेच, जिल्ह्यात चोरी, घरफोडींसह इतर गंभीर प्रकारही थांबत नसल्याचे दिसते. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी वाळू माफिया, गुटखा माफिया, गुंडांना बोलावून घेत समज दिली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या, परंतु तरीही गुन्हेगारीला लगाम लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आजही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.

गुन्हे उघड होईनात?
मागील काही दिवसांपासून गुन्हे उघड होण्याचे प्रमाण घटले आहे. चोऱ्या २४ टक्के, तर घरफोड्याचे गुन्हे अवघे १६ टक्के उघड झाले आहेत. पोलिसांकडे विचारणा केल्यास तपास चालू, एवढेच उत्तर देऊन तक्रारदाराला परत पाठविले जाते. अनेक गुन्हे हे दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.

एलसीबीचे काम कमी अन् वादग्रस्तच जास्त
पोलिस अधीक्षकांच्या थेट आखत्यारीत एलसीबी असते. येथे पोलिस अधिकारी, कर्मचारीही भरपूर आहेत. परंतु, चोरी, घरफोडी, लुटमारीचे तपास फारसे होत नाहीत. एकीकडे तपास कमी असतानाही ही शाखा वादात सापडली आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी पोलिस निरीक्षक उस्मान शेख, उपनिरीक्षक महेश विघ्ने, कर्मचारी सचिन सानप यांच्यावर थेट आरोप केले होते. याच शाखेतील कर्मचारी काही महिन्यांपूर्वी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. सोमवारी या शाखेची वार्षिक तपासणी पोलिस अधीक्षकांनी केली. यात काम सुधारण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

९९ कारवाया दारूबंदीच्या वाढल्या
दारू बंदीच्या कारवायांमध्ये जानेवारी २०२५ मध्ये ९९ ने वाढ झाली आहे. तर, जुगारामध्ये १८ ने घट झाली.

या मोजक्या घटना वाचा
१ - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. चिकन कापण्याच्या सत्तूरने वार केले. वाहनेही जाळण्यात आली.
२ - माजलगाव शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत गुंडांनी गोंधळ घालत स्वर्ग रथ जाळला. वाहनेही पेटवली. येथील लोकांनाही मारहाण केली.
३ - बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील महिलांनी दारू बंद करा, म्हणत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.
४ - वडवणी शहरात टोबॅको सेंटर, लिंबागणेशमध्ये मेडिकल फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
५ - अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीची रोडरोमिओने छेड काढली, बसस्थानकात आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली, एसबीआय बँकेतून दोन लाखांची रोकड लंपास केली, व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला.
६ - चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजही अवैध वाळू वाहतूक सुरूच.
७ - धारूर तालुक्यातील तरनळी येथे एका तरुणावर बातम्या पाहिल्या म्हणून धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.
८ - चोरी, घरफोडीच्या घटना सव्वाशेपेक्षा जास्त घडल्या आहेत.

ही उपक्रम कौतुकास्पद
१ - सामान्य नागरिकांना तक्रार करण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा.
२ - दररोज दुपारी ४ ते ६ पोलिस अधीक्षकांना भेटण्याची वेळ निश्चित.
३ - प्रत्येक शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन व स्वच्छता अभियान.
४ - पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातील एक शुक्रवारी भरणार दरबार.

या गुन्ह्यांमध्ये घट
प्रकार - जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४

खुनाचा प्रयत्न - ८ - १२
फसवणूक - १० - १२
विनयभंग - २९ - ३५

या गुन्ह्यांमध्ये वाढ
प्रकार - जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४

बलात्कार - २१ - ११
घरफोडी - २६ - २४
चोऱ्या - ११० - ९१
दंगा - २६ - १८
पळवून नेणे - १७ - १६
दुखापत - १२४ - १२३
सरकारी कर्मचारावर हल्ला - १० - ३

भाग १ ते ५ एकूण गुन्हे
जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४

५८८ - ५१९

Web Title: When will crime in Beed stop? The Superintendent of Police has been changed but serious crimes continue to occur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.