१७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:06 IST2023-03-03T19:05:37+5:302023-03-03T19:06:12+5:30
आ. धनजंय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा

१७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल
- नितीन कांबळे
कडा - १७ गोण्या कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात केवळ एक रूपयाचा ठोकळा आल्याचे वास्तव लोकमतने गुरूवारी समोर आणले होते. आज अधिवेशनात आ.धनजंय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांनी आता काय करावं असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव लटपटे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने अहमदनगर येथील बाजार समितीत १७ गोण्या कांदा विक्रीसाठी नेला होता. दोन रूपये किलो प्रमाणे त्याला भाव मिळाला ८४४ किलो कांद्याच्या बदल्यात एक रुपया पट्टी हाती पडली होती. लोकमतने गुरुवारी हे वास्तव चित्र प्रकाशित करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर शुक्रवारी आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत आवाज उठवला व १७ गोण्या कांदा विकुन रूपया मिळत असेल तर अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांनी काय करावं! असा प्रश्न उपस्थित केला.