केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:13 PM2023-02-24T22:13:13+5:302023-02-24T22:13:24+5:30

'शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे.'

We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde | केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

googlenewsNext

परळी-येत्या काळात केंद्राच्या यादीत परळी ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही असा इशारा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी दिला. शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत असून त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे. वास्तविक  पाहता परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. परंतु केंद्र सरकारला मात्र आमच्या शहराला म्हणजेच तिर्थक्षेत्राच्या विकासाला निधी तर द्यायचाच नाही सोबतच ज्योतिर्लिंग क्षेत्राचा दर्जासुद्धा काढून घ्यायचा आहे असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केला,

दरम्यान, तुम्हाला निधी द्यायचा नसेल तर देऊ नका, आम्ही आमच्या गावाच्या, ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी निधी गोळा करु, असे सांगत परळीतील नागरिकांनी आपल्या ज्योतिर्लिग क्षेत्राची व येथील उत्पादनाचा लौकीक सर्वदूरपर्यंत पोहचवायला पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. येथील नगरसेवक चंदूलाल बियाणी यांच्या पुढाकारातून  परळी भुषण, विशेष गौरव व बाल धमाल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आ. धनंजय मुंडे बोलत होते. आपल्या भाषणात आ. मुंडे यांनी परळीच्या विकासाचा आलेख समोर ठेवत परळीच्या बेस्ट टेस्टसुद्धा सांगितल्या.

गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी  वैद्यनाथ सहकारी औद्योगीक वसाहत येथे परळी भुषण पुरस्कारांचे वितरण आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आनंदग्रामचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ बारगजे, सौ. संध्याताई बारगजे, मराठवाडा साथीचे मुख्य संपादक, राजस्थानी मल्टीस्टेट चे चेअरमन चंदुलाल बियाणी, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बाल धमाल संयोजन समितीच्या सदस्या मिरा राऊत यांनी गाडगेबाबांची वेशभुषा तर एका मुलीने समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांची भुमिका आयत्यावेळी साकारत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

प्रसिद्ध साहित्यीक तथा राजपत्रीत अधिकारी डॉ. सौ. मंजुषा कुलकर्णी, प्रसिद्ध व्यापारी तथा समाजसेवक विजय सामत, आयुर्वेदाचार्य रामदास रामदासी, ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, ज्येष्ठ कवयत्री सौ. दीपा बंग यांना आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर यावेळी वैद्यनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय  देशमुख , ज अभियंते भिवा बिडगर व राजस्थानी मल्टीस्टेटचे आयटी सेल प्रमुख अनंत भाग्यवंत यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. बीड जिल्हा प्रतिनिधी संदीप बेदरे तसेच गायन स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या कु. वैष्णवी  सावजी यांचाही सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ. धनंजय मुंडे म्हणाले की, परळी शहर हे तिर्थक्षेत्र आहे, वैद्यनाथांची  पवित्र भूमी आहे. या शहरातून अनेकजण लहानाचे मोठे झाले, राज्याच्या काना-कोपऱ्यात ते सक्षमतेने कार्यरत झाले. परळी भुषण पुरस्कार हा मागील अनेक वर्षापासून माझ्या हस्ते दिला गेला म्हणूनच सांगतो, परळी शहर ही गुणवंतांची खाण आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळाला ते आणि यापुर्वी आपण ज्यांना सन्मानित केले या सर्वांच्या माध्यमातून परळीचा लौकीक राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचतोय असा विश्वासही आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. परळी शहराचा सर्वागिण विकास हे माझे स्वप्न आहे पण त्यापुर्वीही आपली परळी ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या  यादीत आणायची आहे असे सांगत प्रत्येक परळीच्या नागरिकाने जिथे शक्य होईल तिथे आपल्या शहराची मार्केटींग करायला पाहीजे असेही ते म्हणाले.

दरम्यान, आज झालेल्या परळी भुषण पुरस्कार वितरण, विशेष गौरव व बालधमाल बक्षीस वितरण  कार्यक्रमात आनंदग्रामचे  दत्ताभाऊ बारगजे यांनी मार्गदर्शन करुन मराठवाडा साथीच्या कामाचे व आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. चंदुलाल बियाणी यांनी बाल धमाल स्पर्धेतून विद्यार्थ्यांना मोठे होण्याची संधी दिली असून भविष्यात यातूनच नवे परळी भुषण घडतील असा विश्वास व्यक्त केला. आजच्या कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुण्याचे स्वागत  सतिश बियाणी, जयप्रकाश बियाणी, सुरज बियाणी, चंद्रशेखर फुटके, लक्ष्मण वैराळ, अजय जोशी आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल धमालचे मुख्य संयोजक ओमप्रकाश बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालधमाल संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.