Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मीक कराडला मारहाण झाल्याची चर्चा; पण तुरुंग प्रशासनाने दिली वेगळीच माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:17 IST2025-03-31T15:09:45+5:302025-03-31T15:17:05+5:30
Walmik Karad Attack: वाल्मीक कराडला मारहाण झाल्याच्या दाव्यामुळे तुरुंग प्रशासनावर हलगर्जीचा आरोप होत होता.

Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मीक कराडला मारहाण झाल्याची चर्चा; पण तुरुंग प्रशासनाने दिली वेगळीच माहिती!
Beed Walmik Karad: बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला. आमदार धस यांच्या या दाव्यामुळे तुरुंग प्रशासनावर हलगर्जीचा आरोप होऊ लागल्यानंतर आता प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देत कराड याला मारहाण झाली नसल्याची माहिती दिली आहे.
बीड कारागृहाचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "आज सकाळच्या सुमारास महादेव गित्ते आणि सोनावणे-फड टोळीत फोन करण्यावरून वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गित्ते आणि या टोळीत वाद झाला असला तरी या घटनेशी वाल्मीक कराड याचा काहीही संबंध नाही," असा खुलासा सुपेकर यांनी केला आहे.
दरम्यान, सदर घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणालाही इजा नाही, अशी माहितीही जालिंदर सुपेकर यांनी दिली.
बीड कारागृहात नेमकं काय घडलं? धसांचा दावा काय?
आमदार सुरेश धस यांनी बीड कारागृहातील घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं मला कळालं," असं धस यांनी सांगितलं आहे.