सायगावजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:36 IST2019-03-14T18:36:16+5:302019-03-14T18:36:47+5:30
सायगाव नजीक पोखरी पाटीजवळ भरधाव कारने एका दुचाकीस्वारास उडविले.

सायगावजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अंबाजोगाई (बीड ) : लातूर - अंबाजोगाई रोडवर बर्दापूर ते अंबासाखर कारखाना या टप्प्यात अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा एक अपघात झाला. सायगाव नजीक पोखरी पाटीजवळ भरधाव कारने एका दुचाकीस्वारास उडविले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नवनाथ अशोक बदाले (वय २२, रा. सोनपेठ, परभणी) असे त्या युवकाचे नाव आहे. ट्रॅक्टरचालक असलेला नवनाथ ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट खरेदीसाठी तो लातूरला गेला होता असे समजते. बुधवारी सायंकाळी ७ वाजता तो दुचाकीवरून (एमएच २२ एजी ८२६९) लातूरहून अंबाजोगाईकडे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नवनाथ बदाले गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचालकाने कारसह घटनास्थळाहून पळ काढला.
अपघाताचा आवाज ऐकून सायगाव येथील युवक सय्यद आमेर, सैफ मणियार, सोनू, रजीयोद्दीन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी नवनाथला खाजगी वाहनातून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी नवनाथची प्रकृती वरचेवर चिंताजनक होत गेली. अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.