सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले, दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:36 IST2026-02-21T13:35:28+5:302026-02-21T13:36:53+5:30

गुन्हा नोंद करण्यासाठी नातेवाईकांनी मयताचे प्रेत तब्बल पाच तास दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या आवारात आणून ठेवले.

Tired of being harassed by moneylenders, youth commits suicide, case registered with Dindrud police | सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले, दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद

सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले, दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद

दिंद्रुड (बीड): सावकारकीच्या जाचास कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. मयताच्या चुलत्याच्या फिर्यादीवरून याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. हा गुन्हा नोंद करण्यासाठी नातेवाईकांनी मयताचे प्रेत तब्बल पाच तास दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या आवारात आणून ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अधिक माहिती अशी की, धारूर तालुक्यातील गावंदरा येथील 22 वर्षीय तरुण धर्मराज अर्जुन बडे याच्या आई-वडिलांनी येथीलच सावकार बालासाहेब कांबळे व त्याची पत्नी कौंताबाई बालासाहेब कांबळे यांच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने कर्ज घेतले होते. या कारणाने धर्मराज, आई संगिता व वडील अर्जुन बडे यांना बालासाहेब व कौंताबाई हे सतत अश्लील भाषेचा वापर करत त्रास देत होते.

कंटाळून धर्मराज व आई संगीता हे धारूर पोलीस स्टेशनला गुरुवारी गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असताना तेथे भागवत अनुरथ वेताळ रा.घागरवाडा याने तुम्ही गुन्हा नोंद करू नका अन्यथा आम्हीही तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देऊ लागला. या सर्व त्रासाला कंटाळून धर्मराज बडे याने पालखी महामार्गावरील कारी शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार धर्मराज याचे चुलते नवनाथ बडे यांनी दिंद्रुड पोलिसांत दाखल केली आहे.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजे दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रेताचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात इन कॅमेरा करण्याची पोलिसांकडे मागणी धरली. अंबाजोगाई येथे शवविच्छेदनानंतर धर्मराज बडे यांच्या नातेवाईकांनी त्याचे प्रेत थेट दिंद्रुड पोलिसांत शुक्रवारी रात्री साडेसात वाजे दरम्यान आणले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

तब्बल साडेचार ते ५ तास या मागणीसाठी प्रेत पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला होता. अखेर दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि महादेव ढाकणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेत गुन्हा नोंद केला. शुक्रवारी रात्री बारा वाजेनंतर गावंदरा येथे शोकाकुल वातावरणात मयत धर्मराज बडे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सलमान शेख पुढील तपास करत आहेत.

Web Title : कर्ज से परेशान युवक ने की आत्महत्या; साहूकारों पर मामला दर्ज।

Web Summary : माता-पिता द्वारा लिए गए ऋण के कारण साहूकारों से परेशान होकर, बीड में एक 22 वर्षीय किसान ने आत्महत्या कर ली। रिश्तेदारों ने पुलिस स्टेशन में विरोध प्रदर्शन किया, कार्रवाई की मांग की, जिसके कारण साहूकारों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया गया।

Web Title : Debt-ridden youth ends life; case registered against moneylenders.

Web Summary : Harassed by moneylenders over a loan taken by his parents, a 22-year-old farmer committed suicide in Beed. Relatives protested at the police station, demanding action, leading to a case being filed against the moneylenders for abetment.