नव्या वर्षाचा संकल्प असावा तर असा! बीडच्या तत्त्वशील कांबळेंचं १ जानेवारीला ८९ वं रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:11 IST2026-01-02T18:05:18+5:302026-01-02T18:11:20+5:30
बीडच्या तत्त्वशील कांबळेंचे नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानाने; १५ वर्षांची अखंडित परंपरा कायम

नव्या वर्षाचा संकल्प असावा तर असा! बीडच्या तत्त्वशील कांबळेंचं १ जानेवारीला ८९ वं रक्तदान
- सोमनाथ खताळ
बीड : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरात जल्लोष, पार्ट्या आणि फटाक्यांची आतषबाजी होत असताना, बीडमधील एक सामाजिक कार्यकर्ता मात्र रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शांतपणे आपले कर्तव्य बजावत होता. बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यानंतर नवीन वर्षातील पहिले रक्तदान करून आपली १५ वर्षांची अखंडित परंपरा कायम राखली आहे.
तत्त्वशील कांबळे हे प्रामुख्याने बालकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. बालकांप्रती असलेल्या याच प्रेमापोटी त्यांनी १४ नोव्हेंबर २००० रोजी, म्हणजेच ‘बालदिना’चे औचित्य साधून आयुष्यातील पहिले रक्तदान केले होते. तेव्हापासून रक्तदानाचे महत्त्व पटलेल्या कांबळे यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. २०१० पासून त्यांनी या उपक्रमाला एका वेगळ्या संकल्पाची जोड दिली; तो संकल्प म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात रक्तादानाने करायची.
विक्रमी ८९ वे रक्तदान
आजच्या धावपळीच्या युगात नियमितता पाळणे कठीण असताना, कांबळे यांनी आतापर्यंत ८८ वेळा रक्तदान केले आहे. यंदाचे त्यांचे हे ८९ वे रक्तदान होते. विशेष म्हणजे, ते केवळ स्वतः रक्तदान करत नाहीत, तर तरुणांची मोठी फळीही सोबत तयार करत आहेत. त्यांच्या या उपक्रमात यंदा अमन अशोक तांगडे या तरुणाने सहभाग नोंदवत आपले आठवे रक्तदान केले. दर तीन महिन्याला रक्तदान करण्याचा कांबळे यांचा शिरस्ता असून, त्यांनी आजवर २५० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातून हजारो रक्तपिशव्यांचे संकलन करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
पुरस्कारांनी सन्मानित सामाजिक कार्य
तत्त्वशील कांबळे यांच्या या निःस्वार्थी सामाजिक कार्याची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात प्रामुख्याने राज्य शासनाचा युवा पुरस्कार, महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार आणि क्रीडा कार्यालयाचा जिल्हा युवा पुरस्कार यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचा अनेकदा गौरव केला आहे.
सामाजिक बांधिलकी कायम
नवीन वर्षाची सुरुवात जर कोणाचे प्राण वाचवून होत असेल, तर त्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकत नाही. ही बांधिलकी अशीच पुढे चालू राहील.
- तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड