बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट'
By सोमनाथ खताळ | Updated: December 3, 2025 17:40 IST2025-12-03T17:35:11+5:302025-12-03T17:40:02+5:30
राष्ट्रीय महामार्ग ५२ वर चोरी, लुटमार व दरोड्याच्या घटना वाढल्या, ही ठिकाणे आहेत धोकादायक

बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट'
बीड :बीड ते तुळजापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५२ वर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बीड, धाराशिव पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने अत्यंत महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा महामार्ग सध्या हॉट स्पॉट बनत असून, यावरील १० ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड आणि धाराशिव पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके तैनात केली असून, आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही ठिकाणे आहेत धोकादायक
प्रवाशांनी या १० धोकादायक ठिकाणी गाडी थांबवणे पूर्णपणे टाळायचे आहे. यात मांजरसुंबा घाट (बीड), चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पार्डी फाटा, घुले माळ जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोल नाका, येडशी बायपास, धाराशिव ते तुळजापूर यांचा समावेश आहे.
चोरट्यांची लुटमार करण्याची नवी पद्धत
कृत्रिम अपघात : धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे आणि मदतीच्या बहाण्याने लुटणे.
कृत्रिम गतिरोधक : ठिबकचे पाइप बंडल वापरून गतिरोधक असल्याचा भास निर्माण करणे, वाहन थांबायला लावणे आणि दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे.
शस्त्रांचा धाक : वाहन अडवून शस्त्र दाखवून जबरी चोरी करणे.
दुचाकीस्वारांना लक्ष करणे : धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा पाठलाग करून 'चेन स्नॅचिंग' करणे.
इंधनचोरी : रात्री हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे.
दुभाजकाचा वापर : दुभाजकामध्ये असलेल्या झाडाझुडपात लपून बसणे आणि वाहनांवर हल्ला करणे.
नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना
थांबू नका : नमूद केलेल्या धोकादायक ठिकाणी किंवा निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे पूर्णपणे टाळा.
समूहाने प्रवास : रात्रीच्या वेळी एकटे प्रवास करणे टाळा. शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने प्रवास करा.
अंतर ठेवा : वाहन चालवताना दुभाजकाला एकदम खेटून चालवू नका, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात.
संशयास्पद हालचाली : रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, वेगात पुढे निघून जा.
मदत : काही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा धाबा यांसारख्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या.
इंधन चोरणारे तिघे पकडले
याच महामार्गावर मोठे वाहने थांबल्यावर त्यातील इंधन चोरणारी टोळी वाशी पोलिसांनी पकडली. साहील शेख, रोहित ओव्हाळे, युवराज ओव्हाळे (रा. भूम) अशी या आरोपींची नावे आहेत. तर, आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. चोरट्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या महामार्गावर नियमित गस्त सुरू आहे. प्रवाशांनी सूचनांचे पालन करून काळजी घ्यावी. संशय वाटल्यास डायल ११२ किंवा जवळच्या लोकांची मदत घ्यावी. अद्यापपर्यंत लुटमारीचा गुन्हा नोंद नाही, परंतु असे प्रकार गस्तीदरम्यान अनेकदा हाणून पाडले आहेत.
- शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक, वाशी (जि. धाराशिव)