बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:55 IST2025-10-30T12:54:12+5:302025-10-30T12:55:03+5:30
चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील रोकड लंपास केली.

बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास
बीड: बीड तालुक्यात चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका धाडसी चोरीचा कट रचत मोठी रोकड लंपास केली आहे. तालुक्यातील पाली येथील कॅनरा बँकेच्या मुख्य लॉकरमधून चोरट्यांनी तब्बल साडेअठरा लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिंत फोडली, गॅस कटर वापरला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेतला. त्यांनी नियोजनपूर्वक बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. बँकेत प्रवेश मिळताच, चोरट्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील रोकड लंपास केली. चोरीची ही पद्धत पाहता, चोरट्यांनी रेकी करून आणि आधुनिक साधने वापरून ही चोरी केल्याचे स्पष्ट होते. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
बीड ग्रामीण पोलीस अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी चोरीसाठी वापरलेली साधने आणि चोरट्यांच्या पावलांचे ठसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेत भिंत फोडून, गॅस कटर वापरून चोरी झाल्याच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.