"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:22 IST2025-11-28T16:21:39+5:302025-11-28T16:22:15+5:30
Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली.

"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने परळीत राजकारण तापले आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जुन्या सहकाऱ्यावरच एका कार्यक्रमात तोफ डागली. ज्याच्यासाठी इतकं केलं, त्याने माझ्याशी गद्दारी केली. तो तुमच्यासोबत कसा इमानदार राहील? असे म्हणत धनंजय मुंडे यांनी परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या निशाणा साधला.
परळी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद नगर भागात धनंजय मुंडे यांची कॉर्नर सभा झाली. या सभेत बोलताना धनंजय मुंडेंनी त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गद्दारी केल्याचा ठपका मारला.
ज्याचा जीव वाचवला, त्याने गद्दारी केली
"ज्याचा मी जीव वाचवला. ज्याच्यासाठी माझे घर फुटले. आज तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला. त्याने तर देवाला सोडले नाही. वैद्यनाथ मंदिरावर हातोडा चालवला. त्याला मतदान करणार का?", अशी टीका धनंजय मुंडेंनी दीपक देशमुख यांच्यावर नाव न घेता केली.
"एकाने गद्दारी करून तुतारी हाती घेतली. माझ्याशी गद्दारी करणारा तुमच्यासोबत इमानदारीने कसा राहणार? पाय तुटल्यानंतर चाळीस लाख... माझे वडील वारले. त्यांनी मला सांगितलेलं की, एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळता कामा नये. पण, आज हे बोलणं मला भाग पडत आहे. कारण माझा एक साथीदार अपघातात गंभीर जखमी झाला होता. मी सगळी कामे सोडून तिथे गेलो. त्याचा जीव वाचवला. तो जर माझ्याशी गद्दारी करत असेल, तर तुमच्यासोबत प्रामाणिक कसा राहील?", असा सवाल करत मुंडेंनी देशमुखांवर निशाणा साधला.
"मला इतक्या प्रचंड मतांनी निवडून दिलं. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखलं. गेल्या वर्षभरापासून तुम्ही बघत आहात की माझ्या मागे लागले. माझ्या इतके मागे लागले की, मी दोन वेळा मरता-मरता वाचलो. काही फरक पडत नाही. माझा शेवटचा श्वासही तुमच्या सेवेसाठी असेल", असे धनंजय मुंडे म्हणाले.
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही प्रचारात उतरल्या आहेत. वेगवेगळ्या प्रभागामध्ये रॅली घेत आहेत. धनंजय मुंडेंही परळीत सकाळपासूनच लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत.