मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:24 IST2022-09-09T12:24:23+5:302022-09-09T12:24:56+5:30
दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले.

मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा
दिंद्रुड (जि. बीड) : माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत दोन वर्षांत विविध योजनांतर्गत आलेली रक्कम मुख्याध्यापकाने स्वत:साठी वापरल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ही रक्कम मुख्याध्यापकाकडून वसूल करीत ग्रामस्थांनी शाळेतील वर्गखोल्या दुरुस्तीचे बांधकाम केले.
येथील मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी सन २०२०-२१ या कार्यकाळात समग्र शिक्षा व पर्यावरण संदर्भातील योजनेतील एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास झोडगे व ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यानंतर नाकलगाव ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. मात्र, याची दखल न घेतल्याने ११ जुलै रोजी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी ग्रामस्थ व मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत घोटाळा केलेली सर्व रक्कम मुख्याध्यापकाने गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिली.
बांधकाम केले -
मुख्याध्यापकाने परत केलेले ९० हजार रुपये गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी शाळेतीलच एका शिक्षकाच्या बँक खात्यावर वर्ग केले. पाच जणांची समिती नेमून त्या पैशांतून शाळेचे बांधकाम केले.
कारवाई होणार का? -
दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले.